अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींची पोलिसांकडून सुटका!
By राजकुमार जोंधळे | Updated: July 11, 2024 20:14 IST2024-07-11T20:14:35+5:302024-07-11T20:14:43+5:30
पुणे, संभाजीनगर, लातूरमधून आरोपी घेतले ताब्यात

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींची पोलिसांकडून सुटका!
लातूर : अपहरण करण्यात आलेल्या तीन मुलींचा शोध घेत त्यांची पुणे, छत्रपती संभाजीनगर येथून सुटका करण्यात आली आहे. याबाबत लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १५ वर्षीय मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते. याबाबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी किनगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर एका १७ वर्षीय मुलीला पळवून नेले होते. याबाबत ६ मार्च २०२४ रोजी किल्लारी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर एका १५ वर्षीय मुलीस कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना लातुरात घडली हाेती. याबाबत २५ एप्रिल २०२४ रोजी विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या मुलींचा आणि अपहरण करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. यासाठी स्थानिक पोलिस ठाणे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून समांतर तपास केला जात होता. अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींबाबत तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिस पथकाने पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर ग्रामीण परिसरातून या तीन अल्पवयीन मुलींना आरोपींसह ताब्यात घेण्यात आले.
आरोपींसह मुलींना त्या-त्या पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दयानंद पाटील, पोउपनि. एस. एस. सूर्यवंशी, अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अंमलदार यादव, गिरी, चालक मणियार यांच्या पथकाने केली.