खेडकरांचे ‘ते’ सीसीटीव्ही दिखाव्यासाठी; दीड वर्षापासून डीव्हीआरच बसवला नसल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 07:07 IST2025-10-10T07:07:18+5:302025-10-10T07:07:32+5:30
ट्रकचालकाच्या अपहरण प्रकरणात त्या सह आरोपी म्हणून गुरुवारी रबाळे पोलिस ठाण्यात हजर हाेत्या. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्या चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर झाल्या.

खेडकरांचे ‘ते’ सीसीटीव्ही दिखाव्यासाठी; दीड वर्षापासून डीव्हीआरच बसवला नसल्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : घरात निव्वळ कॅमेरे बसवले असून, त्यांना दीड वर्षापासून डीव्हीआरच जोडला नसल्याचा दावा मनोरमा खेडकर यांनी केला आहे. त्या चौकशीसाठी रबाळे पोलिस ठाण्यात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पती दिलीप खेडकर यांच्यासोबत आपला फारसा संवाद नसून घटनेच्या दिवशी काय घडले त्याबद्दल कल्पना नसल्याचे सांगितले.
ट्रकचालकाच्या अपहरण प्रकरणात त्या सह आरोपी म्हणून गुरुवारी रबाळे पोलिस ठाण्यात हजर हाेत्या. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्या चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर झाल्या. घरात कोणाला डांबून ठेवले नव्हते, आमच्या कुटुंबियाला जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचे मनोरमा यांनी सांगितले. तसेच घरातला डीव्हीआर गायब केल्याच्या पोलिसांच्या आरोपाचे खंडन करून त्यांनी दीड वर्षापासून डीव्हीआरच जोडलेला नसल्याचे चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. घरात सीसीटीव्ही आहे, हे भासवण्यासाठी निव्वळ कॅमेरे जोडून ठेवल्याचा दावा त्यांनी केला. मनोरमा यांना बेलापूर न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. त्यापुढेही न्यायालयावर आपला विश्वास असून, पती दिलीप खेडकर यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात त्यांचे पती दिलीप खेडकर हे अद्याप फरार आहेत.
पतीसोबत संवाद नाही
अपहरणाच्या घटनेबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगून पती दिलीप खेडकर यांच्यासोबत आपला फारसा संवाद नसून, ते कधी येतात व कधी जातात याची आपल्याला कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले. १४ सप्टेंबरला जेव्हा रबाळे पोलिसांचे पथक गुन्ह्याच्या तपासात खेडकर यांच्या घरावर धडकले होते, त्यावेळी मनोरमा यांनी पोलिसांना घरात येण्यास अटकाव केला होता. तसेच त्यांनी आपल्यावर श्वान सोडल्याचाही पोलिसांचा आरोप होता. यामुळे त्यांना पतीविरोधात दाखल गुन्ह्यात सह आरोपी केले.