VIDEO: ...अन् अचानक पाईपमधून निघू लागल्या नोटा; पाण्यासारखा पैसा पाहून अधिकारी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 20:04 IST2021-11-24T17:37:37+5:302021-11-24T20:04:35+5:30
भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरी एसीबीच्या टीमला सापडलं घबाड; संपत्ती पाहून एसीबीचे अधिकारी अवाक्

VIDEO: ...अन् अचानक पाईपमधून निघू लागल्या नोटा; पाण्यासारखा पैसा पाहून अधिकारी चक्रावले
बंगळुरू: कर्नाटक सरकारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचारविरोधी विभागानं (एसीबी) कारवाई सुरू केली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून एसीबीनं १५ अधिकाऱ्यांशी संबंधित ६० ठिकाणांवर एसीबीनं धाडी टाकल्या. विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांवर टाकण्यात आलेल्या धाडींमधून प्रचंड मोठं घबाड एसीबीच्या हाती लागलं.
कर्नाटक सरकारच्या १५ अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर एसीबीनं छापे टाकले. या कारवाईत ८ एसपी, १०० अधिकारी आणि ३०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. एसीबीच्या पथकानं ६० ठिकाणांवर धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान साडे आठ किलोहून अधिक सोनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या घरातून हस्तगत करण्यात आलेली संपत्ती पाहून एसीबीच्या पथकाचे डोळे विस्फारले.
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर एसीबीचे छापे; पाईपलाईनमधून बाहेर पडलेल्या नोटा पाहून एनसीबी अधिकारी अवाक् pic.twitter.com/dFXw7Bs4ZG
— Lokmat (@lokmat) November 24, 2021
पाईपमधून बाहेर पडला पाण्यासारखा पैसा
पीडब्ल्यूडीचा सहअभियंता शांथा गौडा बिरादर याच्या घरी छापा टाकण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं. याशिवाय २५ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. छापा पडणार असल्याची माहिती बिरादरला आधीच मिळाली होती. त्यामुळे त्यानं बराचशी रोकड घराबाहेर असलेल्या पाईपांमध्ये लपवली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्लंबरच्या मदतीनं ही संपूर्ण रक्कम बाहेर काढली.
कृषी विभागाचे संयुक्त संचालक टी. एस. रुद्रेशप्पा यांच्या घरातून ७ किलो सोनं ताब्यात घेण्यात आलं. त्याचं बाजारमूल्य ३.५ कोटी रुपये आहे. त्यांच्या घरात १५ लाखांची रोकड आढळून आली. वरिष्ठ मोटर निरीक्षक सदाशिव मारलिंगन्नावर यांच्या घरातून १.१३५ किलो सोनं जप्त करण्यात आलं. त्यांच्या घरात ८ लाख २२ हजार १७२ रुपयांची रोकड सापडली.