जावयाच्या आत्महत्येचा व्हिडीओ पाहून सासरवाडी हादरली; घटनास्थळी पोहोचलेले पोलीस चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:26 IST2021-10-14T16:26:34+5:302021-10-14T16:26:44+5:30
जावयाच्या मृत्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; सासरच्या मंडळींनी केला नियंत्रण कक्षाला फोन

जावयाच्या आत्महत्येचा व्हिडीओ पाहून सासरवाडी हादरली; घटनास्थळी पोहोचलेले पोलीस चक्रावले
पत्नीसोबतच्या भांडणाला कंटाळून पतीची आत्महत्या, पतीशी वाद झाल्यानंतर पत्नीनी स्वत:ला संपवलं अशा घटना अनेकदा कानावर येतात. पण कानपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका पतीनं पत्नीला धडा शिकवण्यासाठी वेगळाच मार्ग शोधून काढला. पत्नी आणि सासरच्या माणसांना त्रास देण्यासाठी पतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. आपल्या मृत्यूचा बोगस व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केला.
जावई छेदीवालनं आत्महत्या केली असल्याचं सासरच्या माणसांना समजलं. त्यांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलीस तातडीनं छेदीवालच्या घरी पोहोचले. तिथे छेदीलाल आणि व्हिडीओ तयार करणारा त्याचा मित्र पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
कानपूरमध्ये स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणारा छेदीलाल नवाबगंजचा रहिवासी आहे. त्याची सासुरवाडी उन्नावमध्ये आहे. सासरवाडीत भांडण करून छेदीलाल तिथून निघून आला. मी आत्महत्या करेन अशी धमकी त्यानं निघताना मेहुणा कुंदनाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात कुंदनच्या फोनवर छेदीलालच्या मृत्यूचा व्हिडीओ आला.
छेदीलालनं त्याचा मित्र कालीचरणच्या मदतीनं मृत्यूचा बनाव रचला. आत्महत्या करत असल्याचं संपूर्ण चित्रीकरण कालीचरणनं केलं. याबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी छेदीलाल आणि कालीचरणाला बेड्या ठोकल्या. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.