धक्कादायक! ओमायक्रॉनच्या दहशतीनं डॉक्टर बनला खूनी; स्वत:च्या कुटुंबालच संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 05:47 IST2021-12-05T05:47:14+5:302021-12-05T05:47:29+5:30
ओमायक्रॉन विषाणूची दहशत घेतल्याचा डायरीत केला उल्लेख, नैराश्यातील डॉक्टरने पत्नी, मुलगा, मुलीची केली हत्या

धक्कादायक! ओमायक्रॉनच्या दहशतीनं डॉक्टर बनला खूनी; स्वत:च्या कुटुंबालच संपवलं
कानपूर : कोविड-१९ चा नवा विषाणू ओमायक्रॉनने लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. सामान्य लोकांना सोडाच रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही या विषाणूला घाबरून आहेत. येथील सुशील कुमार मंधना या मेंदूच्या डॉक्टरला ओमायक्रॉन विषाणूच्या दहशतीमुळे नैराश्य आले. त्यातून त्यांनी त्यांची पत्नी, मुलगा व मुलीची हत्या केली व फरार झाले. हत्येच्या आधी डॉक्टरने मनात जे काही सुरू होते ते डायरीत लिहिले. डॉक्टरने त्याच्या भावाला शुक्रवारी सायंकाळी मेसेज पाठवून या हत्यांची माहिती दिली.
मंधना यांनी स्वत:ला कोविड फोबियाचा बळी सांगितले. त्यांनी डायरीत लिहिले की,“आता कोविड नाही. हा कोविड सगळ्यांना मारून टाकेल. आता मृतदेह नाही मोजायचे तर ओमायक्रॉन.” सुशील कुमार मंधना वैद्यकीय महाविद्यालयात फोरेन्सिक विभागाचे प्रमुख होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णालयात मंधना यांनी कोविड रुग्णांना खूप जवळून तडफडत मरताना पाहिले होते. त्यांच्या वेदना व यातना त्यांच्या मनातून काही जात नव्हत्या. कोरोनाची दुसरी लाट थांबल्यापासून त्यांना नैराश्य आले होते.
डॉ. सुशील यांनी डायरी लिहिल्यानंतर सगळ्यांसाठी चहा बनवला. त्यात गुंगी आणणारी पावडर मिसळली. चहा पिल्यानंतर डॉक्टरची पत्नी चंद्रप्रभा (४८), मुलगा शिखर (१८) आणि मुलगी खुशी (१४) बेशुद्ध पडले, नंतर डॉक्टरने तिघांनाही वेगवेगळ्या खोल्यात नेले.
डॉक्टरने अगदी सहज पत्नीला मारून टाकले. शिखर व खुशीचा गळा दाबला व फरार झाला. हत्या झाली त्या ठिकाणी रक्ताने माखलेला हातोडा आढळला. जाणकारांचे म्हणणे असे की, एक व्यक्ती तीन जणांची हत्या करू शकत नाही. हत्येच्या आधी तिघांनाही बेशुद्ध केले असावे. शवविच्छेदन अहवालातून सर्व खुलासा होईल.
माझा हलगर्जीपणा
ओमायक्रॉन विषाणू डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पटींनी धोकादायक असल्याचे डॉ. मंधना यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी हत्येच्या आधी डायरीत लिहिले की,“मी कोविडसंबंधित डिप्रेशन ‘फोबिया’त आहे. मी माझ्या हलगर्जीपणामुळे करिअरच्या अशा पायरीला अडकलो आहे की तेथून निघणे अशक्य आहे. मला काही भविष्य राहिलेले नाही. मी पूर्ण शुध्दीत आपल्या कुटुंबीयांना संपवून स्वत:लाही नष्ट करीत आहे. याला कुणीही जबाबदार नाही.”