चित्रपट दिग्दर्शक अनीशचं अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी कन्नड अभिनेत्री ऐश्वर्या हिच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या बातमीने कन्नड चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. बंगळुरूच्या अडुगोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये अपहरण, अमानुष मारहाण, लूट आणि खंडणी वसुलीसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, हा संपूर्ण वाद अनीशच्या 'जीवादा भाषा' या चित्रपटात गुंतवलेल्या रकमेवरून सुरू झाला. अनीश क्रिएशन्स मॉडेलिंग अँड कास्टिंग नावाची एजन्सी चालवणाऱ्या अनीशला लक्ष्मीनारायण यांनी गुंतवणुकीसाठी सुमारे ५-६ लाख रुपये दिले होते. याच रकमेवरून दोघांमध्ये मतभेद झाले आणि तणाव वाढला.
तक्रारीनुसार, २०२४ मध्ये अडुगोडी येथील नंजप्पा लेआउटमध्ये राहत असताना अनीशची भेट आशी उर्फ आशीर्वादशी झाली. आशीर्वादने अनीशकडून अडीच लाख रुपये उधार घेतले होते, असा आरोप आहे. पाच महिन्यांपूर्वी जेव्हा अनीशने पैसे परत मागितले, तेव्हा आशीर्वादने पैसे देण्याऐवजी त्याला धमकावलं. यानंतर दिग्दर्शक अनीशने अनेन नावाच्या व्यक्तीमार्फत तामिळनाडू पोलिसांत तक्रार दाखल केली. अनीश आपली होंडा सीआरव्ही (CRV) कार विकण्याचा प्रयत्न करत होता, त्यासाठी त्याने अभिनेत्री ऐश्वर्याशी संपर्क साधला. ऐश्वर्याने अनीशला तिचा मित्र शाहिदशी 'खरेदीदार' म्हणून ओळख करून दिली.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी अनीश मुंबईहून बंगळुरूला रवाना झाला आणि ९ फेब्रुवारीला तिथे पोहोचला. तिथे त्याची भेट इंदिरा नगरजवळ ऐश्वर्या, शाहिद आणि एका तिसऱ्या व्यक्तीशी झाली. शाहिदने कारची तपासणी करणं आवश्यक असल्याचं सांगून अनीशला एका गॅरेजमध्ये पाठवलं. अहवालानुसार, तपासणीनंतर अनीशला शाहिदच्या भावाच्या घरातून दीड लाख रुपये आणण्यासाठी बोलावण्यात आले.
बेदम मारहाण केली
अनीशने असा दावा केला की, जेव्हा तो दुसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये गेला तेव्हा त्याला आतून बंद करण्यात आले. त्याचवेळी आशीर्वाद आणि आणखी एक व्यक्ती क्रिकेटचे स्टंप आणि हॉकी स्टिक घेऊन आले आणि त्यांनी अनीशवर हल्ला केला. आशीर्वादने अनीशला पुरावे नष्ट करण्याची आणि जुनी तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. अनीशने नकार दिल्यावर घरात उपस्थित असलेल्या ५-६ लोकांच्या टोळीने त्याला बेदम मारहाण केली, ज्यात अनीश गंभीर जखमी झाला.
दागिन्यांची लूट आणि ३० हजारांची रोख लंपास
'फ्री प्रेस जर्नल'नुसार, तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, आशीर्वादने दिग्दर्शक अनीशकडून २२ ग्रॅमचे सोन्याचे कडे, १ ग्रॅमची सोन्याची चेन, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि ३० हजार रुपये रोख लुटले. मुंबईतील घरातून फोनचा डेटा काढण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. लक्ष्मीनारायण यांचा नातेवाईक सुजान हा देखील या कटात सामील झाला आणि त्याने अनीशला मुंबईला नेण्याचा दावा केला.
अभिनेत्री ऐश्वर्यासह ११ आरोपींना अटक
टोल प्लाझा ओलांडल्यानंतर गाडी एका निर्जन ठिकाणी नेण्यात आली, जिथे आणखी चार लोक सामील झाले. अनीशने असा दावा केला की, त्याच्या नाकावर जोरात बुक्का मारण्यात आला, ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला. असह्य वेदना होऊ लागल्याने त्याने वैद्यकीय मदतीची मागणी केली. आशीर्वादने अनीशकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली आणि त्याला संजय गांधी रुग्णालयात सोडण्यापूर्वी त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून ५,५०० रुपये काढून घेतले. पोलिसांनी अभिनेत्री ऐश्वर्यासह सर्व ११ आरोपींना अटक केली असून, या कटाचा सखोल तपास आणि प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. अनीशवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
Web Summary : Kannada director Aneesh was kidnapped and assaulted over film funding. Actress Aishwarya and ten others are arrested. He was lured, held captive, beaten, and robbed. The police are investigating the case.
Web Summary : कन्नड़ निर्देशक अनीश का फिल्म फंडिंग को लेकर अपहरण और मारपीट की गई। अभिनेत्री ऐश्वर्या और दस अन्य गिरफ्तार। उन्हें बहला-फुसलाकर बंदी बनाया गया, पीटा गया और लूट लिया गया। पुलिस मामले की जांच कर रही है।