न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:17 IST2026-04-11T09:16:46+5:302026-04-11T09:17:32+5:30
राजीनाम्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोगाची कार्यवाही आता चालणार नाही

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: गेल्या वर्षी दिल्लीतील निवासस्थानी जळालेल्या चलनी नोटा सापडल्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला. स्वत:हून राजीनामा दिल्याने त्यांना आता पेन्शनचा लाभ मिळू शकेल.
न्या. वर्मा यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोगाची कार्यवाही आता चालणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असताना न्या. वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होळीच्या दिवशी १४ मार्च २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली होती. अग्निशामक दलाने आग विझवल्यानंतर या खोलीत प्रचंड प्रमाणात जळालेल्या चलनी नोटा सापडल्या होत्या.
९ एप्रिल रोजी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात ५७ वर्षीय न्यायमूर्ती वर्मा यांनी आपण अत्यंत दु:खी मनाने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. या पदावर सेवा करणे ही आपल्यासाठी गौरवाची बाब होती, असे त्यांनी नमूद केले आहे. न्या. वर्मा यांनी पूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राकेश पांडेय यांनी म्हटले आहे.
असा आहे घटनाक्रम
- १४ मार्च २०२५ : दिल्लीत तुघलक क्रिसेंटस्थित न्यायाधीशांच्या या बंगल्यात रात्री साडेअकरा वाजता आग लागली. यात जळालेल्या नोटांचे बंडल होते.
- ३ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने न्या. वर्मा यांना गैरव्यवहारात दोषी ठरवले व पदावरून हटवण्याची शिफारस केली.
- ८ मे रोजी सरन्यायाधीशांनी पंतप्रधान व राष्ट्रपतींना पत्र लिहून पद सोडण्यास नकार देणाऱ्या न्या. वर्मांविरुद्ध महाभियोग चालवण्याची शिफारस केली.
- १२ ऑगस्टला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी न्या. वर्मा यांना बडतर्फ करण्यासंबंधी सर्वपक्षीय प्रस्ताव स्वीकारला.