Jharkhand Crime: झारखंडमधील दुमका येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या आई-वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यरात्री प्रेयसीच्या घरात घुसून आरोपीने आधी आपल्या प्रेयसीच्या आई-वडिलांचा गळा कापला, त्यानंतर प्रेयसी आणि तिच्या बहिणीवरही हल्ला केला. मात्र, प्रेयसी आणि तिची बहीण आपला जीव वाचवून पळाले.
लोकेश मुर्मू असे या आरोपी प्रियकराचे नाव असून, हिरामुनी असे प्रेयसीचे नाव आहे. प्रेयसीच्या पालकांनी लग्नास नकार दिल्यामुळे भर पावसात तो मध्यरात्री आपल्या प्रेयसीच्या घरी धारदार शस्त्र घेऊन गेला आणि हिरामुनीचे वडील साहेब हेम्ब्रम आणि आई मंगली किस्कू यांचा गळा कापून खून केला. त्यानंतर प्रेयसी हिरामुनी आणि तिच्या धाकट्या बहिणीवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. यामुळे दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
दोन्ही मुलींवर उपचार सुरू मध्यरात्री मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून संपूर्ण गाव जागे झाले. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दुमका जिल्ह्यातील शिकारीपारा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही जखमी मुलींना दुमका जिल्ह्यातील फूलोन-झानो मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोन्ही मुलींवर उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.