टँकरचे सील तोडून विमान इंधनाची चोरी; टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:43 IST2026-04-06T12:43:10+5:302026-04-06T12:43:50+5:30

महामार्गावरील ढाब्यावर टँकरचालक थांबतात

Jet fuel theft by breaking tanker seal; Gang arrested by Ahilyanagar Local Crime Branch | टँकरचे सील तोडून विमान इंधनाची चोरी; टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

टँकरचे सील तोडून विमान इंधनाची चोरी; टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर): महामार्गावर हॉटेलच्या परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून विमानाचे इंधन चोरणाऱ्या टोळीला अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे करण्यात आली. या टोळीकडून टँकरसह ८८ लाख ५८ हजार ७७० रुपये किमतीचे इंधन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा) परिसरात इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून (क्र. एम. एच. ०४, एल.क्यू. ६८६५)  तीन व्यक्ती ड्रममध्ये एटीएफ इंधन (विमानाचे इंधन) काढताना पोलिसांनी मुकेश रामअकबाल सिंग, रामभवन रामतिरथ राजपूत (दोघेही, उत्तर प्रदेश), चंदू शिवराम जांभुळकर (रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशा तिघांना अटक केली. 

महामार्गावरील ढाब्यावर टँकरचालक थांबतात 

गॅस, पेट्रोल, डिझेल, आदी इंधनाची वाहतूक करणारे टँकरचालक हॉटेल, ढाबा परिसरात आपले टँकर थांबवितात. याच ठिकाणी टँकरचे सील तोडून इंधनाचा साठा केला जातो. यामध्ये टँकरचालकांचाच सहभाग असल्याचे दिसते. नंतर हा साठा काळ्या बाजारात विकला जातो.

आरोपींकडून ४५ लाख ९१ हजार ८७० रुपये किमतीचे २८ हजार लिटर  इंधन, ४० लाख रुपये किमतीचा एक टँकर, इतर साहित्य जप्त केले . या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरिश भीमसिंग (रा. पिंपरी, पुणे) व इतर साथीदार फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title : विमान ईंधन चोरी गिरोह का भंडाफोड़; अहिल्यानगर में टैंकर जब्त।

Web Summary : अहिल्यानगर में विमान ईंधन चुराने के आरोप में पुलिस ने तीन लोगों को गिरफ्तार किया। राजमार्ग के पास एक होटल के पास गिरोह को रंगे हाथों पकड़ा गया। अधिकारियों ने ₹88.58 लाख मूल्य का टैंकर और ईंधन जब्त किया। मुख्य संदिग्ध अभी भी फरार है।

Web Title : Aviation fuel theft ring busted; tanker seized in Ahilyanagar.

Web Summary : Police arrested three in Ahilyanagar for stealing aviation fuel from a tanker. The gang was caught red-handed near a highway hotel. Authorities seized the tanker and fuel worth ₹88.58 lakhs. The main suspect is still at large.

टॅग्स :Robberyचोरी