कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील जयलक्ष्मी यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण आता हत्येचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात जयलक्ष्मी यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा दत्तक मुलगा चंद्रशेखर आणि बहीण अनसूया यांना अटक केली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
५८ वर्षीय जयलक्ष्मी तुमकूर येथील गट शिक्षण कार्यालयात कार्यरत होत्या. जोगीहल्ली गावात त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारी केली होती, मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला. जयलक्ष्मी यांनी त्यांची बहीण अनसूया हिचा मुलगा चंद्रशेखर याला लहानपणीच दत्तक घेतलं होतं आणि त्याचं संगोपन केलं होतं.
कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारासाठी करत असलेली घाई पाहून पोलिसांना शंका आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात जयलक्ष्मी यांचा खून करण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दत्तक मुलगा आणि बहिणीला ताब्यात घेतलं. चिक्कनायकनहल्ली पोलीस ठाण्यात या हत्येची नोंद करण्यात आली असून पोलीस सर्व पैलूंचा तपास करत आहेत.
तपासात असं समोर आलं आहे की, जयलक्ष्मी यांचे पती लग्नानंतर तीन वर्षांतच वारले होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून त्या श्रीनिवास नावाच्या केबल ऑपरेटरसोबत 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये होत्या. श्रीनिवास यांनी अनेक वर्षे जयलक्ष्मी यांची काळजी घेतली होती. जयलक्ष्मी आपली सर्व संपत्ती आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणारा निधी श्रीनिवास यांच्या नावावर करतील अशी भीती अनसूयाला वाटत होती.
याच भीतीतून आणि संपत्तीच्या लोभापोटी अनसूयाने आपला मुलगा चंद्रशेखर याच्या मदतीने जयलक्ष्मी यांना कायमचं संपवण्याचा भयंकर कट रचला. ज्या मुलाला जयलक्ष्मी यांनी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं, त्यानेच संपत्तीसाठी आईचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.