जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस

By दिगांबर जवादे | Updated: September 7, 2025 21:15 IST2025-09-07T21:14:44+5:302025-09-07T21:15:50+5:30

शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली.

Jahal Maoist Shankar Miccha arrested by Gadchiroli police; hiding in Hyderabad, reward of Rs 2 lakhs | जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस

जहाल माओवादी गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात; हैदराबादमध्ये हाेता लपून, दाेन लाखांचे बक्षीस

- दिगांबर जवादे

गडचिरोली : खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेला जहाल माओवादी शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा (वय २५, रा. बांदेपारा, ता. भोपालपट्टनम, जि. बिजापूर, छत्तीसगड) याला गडचिराेली पाेलिसांनी हैदराबाद (तेलंगणा) येथून शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली. नंतर तो पेरमिली दलममध्ये सदस्य म्हणून २०२४ पर्यंत सक्रीय राहिला.

त्याच्या कार्यकाळात त्याने चार मोठ्या चकमकींमध्ये सहभाग नोंदवला आहे. २०२० मध्ये येडदर्मी जंगल, २०२१ मध्ये मडवेली जंगल, २०२३ मध्ये वेडमपल्ली जंगल व २०२४ मध्ये चितवेली जंगल परिसरातील चकमकींमध्ये तो सहभागी होता.

पोलिसांच्या तीव्र अभियानामुळे घाबरून त्याने २०२४ मध्ये पेरमिली दलम सोडले. त्यानंतर काही महिने घरी शेतीकाम करून तो आंध्र प्रदेशातील एंटापूर व नंतर हैदराबाद येथे स्थायिक झाला होता. पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे त्याच्यावर पाळत ठेवून अखेर ४ सप्टेंबर रोजी सी-६० पथकाने त्याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यांच्या मार्गदर्शनात कारवाई
विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, परिक्षेत्रीय पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुलराज जी. तसेच डीवायएसपी विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनात सहायक पाेलिस निरिक्षक प्रशांत बोरसे, पाेलिस उपनिरिक्षक अक्षय लव्हाळे, पवन जगदाळे, संतोश नरोटे,राहुल दुर्गे यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Jahal Maoist Shankar Miccha arrested by Gadchiroli police; hiding in Hyderabad, reward of Rs 2 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.