नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : सिनेस्टाईल पाठलाग करून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 10:13 PM2020-01-07T22:13:51+5:302020-01-08T00:08:55+5:30

जुन्या वैमनस्यातून सहा ते सात सशस्त्र गुंडांनी एका कुख्यात गुंडांची सिनेस्टाईल हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर. के. सावजी भोजनालयात मंगळवारी सायंकाळी ६. ३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

Infamous gangster murdered in Nagpur: Cenestyle chased and killed | नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : सिनेस्टाईल पाठलाग करून मारले

नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : सिनेस्टाईल पाठलाग करून मारले

Next
ठळक मुद्दे राणी दुर्गावती चौकात थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या वैमनस्यातून सहा ते सात सशस्त्र गुंडांनी एका कुख्यात गुंडांची सिनेस्टाईल हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर. के. सावजी भोजनालयात मंगळवारी सायंकाळी  ६. ३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. शेख समीर ऊर्फ बाबू शेख (वय २३) असे मृताचे नाव असून, तो इंदिरा मातानगरात राहत होता.
समीर यशोधरानगरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यात तीन वर्षांपासून सक्रिय होता. २०१७ मध्ये त्याने एकाची हत्या केली होती. तो बाबू म्हणून ओळखला जायचा. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आणि परत गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याचा या भागातील प्रतिस्पर्धी गुन्हेगाराच्या टोळीसोबत वाद होता. त्या वादातून त्याचे अनेकदा खटकेही उडाले होते. या पार्श्वभूमीवर समीर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास राणी दुर्गावती चौकाजवळ आला.

प्रतिस्पर्धी गुंडांना दिसताच ते समीरकडे धावले. त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे पाहून समीर सुसाट पळत सुटला. तो पुढे आणि हातात शस्त्र धरून आरडाओरड करीत गुंड त्याच्या मागे, असे सिनेस्टाईल दृष्य रस्त्यावरच्या नागरिकांना थरारून सोडणारे होते. समीर एका बारमध्ये शिरला. तेथेही जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्याने तेथून तो आर. के. सावजी भोजनालयात मागच्या बाजूने शिरला. यावेळी त्याच्या मागेच असलेल्या आरोपींनी समीरला पकडून तीक्ष्ण शस्त्राचे घाव घालून त्याला जागीच ठार मारले. समीर रक्ताच्या थारोळळ्यात पडल्यानंतर आरोपी पळून गेले. भोजनालयातील वेटर्सनी आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावली. त्यांनी समीरला एका ऑटोत घालून मेयोत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या थरारकांडाची माहिती कळताच यशोधरानगर, पाचपावली आणि जरीपटक्याचे गस्तीवरील पोलीस पथकं घटनास्थळी धावले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पलही पोहचले. त्यांनी हत्याकांडाची माहिती घेतल्यानंतर आरोपींची नावेही जाणून घेतली. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी वेगवेगळी पथके कामी लावली. वृत्त लिहिस्तोवर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू होती.

त्या गुन्ह्याशी संबंध ? 
समीरने दोन वर्षांपूर्वी एकाची हत्या केली. त्यातून सुटून बाहेर आल्यानंतर तो निर्ढावल्यासारखा वागत होता. तर, त्याचा गेम करण्यासाठी त्या हत्याकांडाशी जुळलेली काही मंडळी समीरवर सूड उगविण्याची संधी शोधत होते. आज  ज्या आरोपींनी समीरची हत्या केली, त्यांचे समीरसोबत वैमनस्य होते, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, हे वैमनस्य दोन वर्षांपूर्वीच्या हत्याकांडाशी संबंधित आहे की नाही, ते स्पष्ट झाले नाही. या संबंधाने आम्ही चौकशी करीत असल्याचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी लोकमतशी बोलताना सांगिलते.

अंगावर काटा आणणारे दृश्य 
 आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे समीरची हत्या केली. यावेळी भोजनालयात असलेल्या वेटरच्या हातातील भाजीचा गंज खाली पडला आणि त्यातील मांस तसेच समीरच्या रक्ताचा सडा फर्शीवर पडला. घटनास्थळावरचे हे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. समीरच्या मृतदेहाबाजूलाच एक कटर पोलिसांना सापडले. ते आरोपींचे आहे की समीरचे त्याची पोलीस चौकशी करीत आहेत.


अवघ्या दीड तासात दोघांची हत्या
उपराजधानीत अवघ्या दीड तासात दोघांची हत्या झाल्याने प्रचंड दहशत पसरली आहे. मंगळवारी रात्री ६. ३० च्या सुमारास जुन्या वैमनस्यातून सहा ते सात सशस्त्र गुंडांनी एका कुख्यात गुंडांची सिनेस्टाईल हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर. के. सावजी भोजनालयात   ही थरारक घटना घडली. शेख समीर ऊर्फ बाबू शेख (वय २३) असे मृताचे नाव असून, तो इंदिरा मातानगरात राहत होता. या हत्याकांडातील आरोपींची शोधाशोध सुरू असतानाच रात्री ८ च्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले. 

वाठोड्यातील मृत आणि आरोपी अज्ञात 
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू श्रीराम नगर आहे. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास या परिसरात एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे पोलिसांचा ताफा तिकडे पोहचला. मृत अंदाजे २५ वर्षे वयोगटातील आहे. त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचून मारेकरी पसार झाले. मृत कोण आणि त्याला कुणी मारले, ते स्पष्ट झाले नाही. तो जिन्स आणि हिरवा टी शर्ट घालून आहे. मारेकऱ्यांनी त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप केला. मृत तसेच आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलीस मध्यरात्रीपर्यंत धावपळ करीत होते. 
अवघ्या दीड तासात घडलेल्या हत्येच्या दोन घटनांनी उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांनीही घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने शोधण्यासाठी संबंधित ठाण्यातील पोलिसांना आदेश दिले.

Web Title: Infamous gangster murdered in Nagpur: Cenestyle chased and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.