मुलं बाहेर रंगपंचमी खेळत होती, घरात वडिलांनी मोबाईल चार्जरनं आईचा गळा दाबला; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:57 IST2022-03-24T13:51:44+5:302022-03-24T13:57:42+5:30
मुलं घरातून बाहेर जाताच वडिलांनी गळा आवळून आईला संपवलं

मुलं बाहेर रंगपंचमी खेळत होती, घरात वडिलांनी मोबाईल चार्जरनं आईचा गळा दाबला; अन् मग...
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रंगपंचमीचा उत्साह असताना एका कंत्राटदारानं पत्नीची हत्या करत स्वत:ला संपवलं आहे. मोबाईल चार्जरच्या मदतीनं कंत्राटदारानं पत्नीचा गळा दाबला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. इंदूरच्या द्वारकापुरीत ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमी खेळण्यासाठी मुलं घराबाहेर पडताच कंत्राटदारानं पत्नीला संपवलं. पतीला पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय होता. त्यामुळे बऱ्याच महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. 'पत्नीची हत्या करून आत्महत्या करतोय,' असा मजकूर त्यात होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
रणजीत असं कंत्राटदाराचं नाव आहे. रणजीतनं त्याची पत्नी संतोषीची चार्जरनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ला गळफास लावून घेतला. यावेळी त्यांचा मुलगा सौरभ (१४) आणि मुलगी निधी (१०) घराबाहेर रंगपंचमी खेळत होते. दोघे रंगपंचमी खेळून घरी परतले, तेव्हा त्यांना आई वडील मृतावस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी याची माहिती शेजारच्यांना दिली.