अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:42 IST2025-08-27T13:41:35+5:302025-08-27T13:42:02+5:30
पोलिसांनी श्रद्धाच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता, काही दिवसांपूर्वी श्रद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता असं समोर आले

अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
इंदूरच्या एमआयजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक कॉलेज तरूणी श्रद्धा तिवारी शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता झाली आहे. या तरूणीने घरातून निघताना तिचा मोबाईल घरीच सोडून दिला. नातेवाईकांनी तिच्या गायब होण्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. सुरुवातीच्या तपासात घरच्यांनी ओरडल्याने ही तरूणी नाराज झाल्याचे समोर आले. त्यातूनच तिने घर सोडले आहे. पोलिसांना तपासात काही सीसीटीव्ही फुटेज सापडले, त्यात ही मुलगी लोटस कॉलनीच्या दिशेने जाताना दिसत होती.
मात्र जेव्हापासून ही तरूणी बेपत्ता झाली आहे तेव्हापासून तिच्या घरच्यांनी मुलीचा उलटा फोटो दाराच्या चौकटीला लावला आहे. राजा रघुवंशी हत्याकांडानंतर सोनम सुखरूप परतावी म्हणून तिच्या कुटुंबानेही दाराला उलटा फोटो लावला होता. आता श्रद्धा तिवारीच्या कुटुंबानेही हाच प्रकार केला आहे. मुलगी इंजिनिअर असलेल्या सार्थक नावाच्या मुलासोबत संपर्कात होती. कदाचित त्यानेच मुलीला पळवून नेले असेल अशी शंका कुटुंबाने व्यक्त केली. पोलिसांनी सार्थकला चौकशीसाठी बोलावले असता मागील १५ दिवसांपासून तिचे आणि माझे काहीच बोलणे झाले नसल्याचे सांगितले कारण कुटुंबाच्या भीतीने श्रद्धा घाबरली होती असं तो म्हणाला. पोलिसांनी कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यातही काही खास आढळून आले नाही.
तर पोलिसांनी श्रद्धाच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता, काही दिवसांपूर्वी श्रद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता असं समोर आले. त्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला मारहाण केली होती. त्यामुळे ती आणखी निराश झाली आणि आता घर सोडून गेली आहे असं तपासात पुढे आले. श्रद्धा तिवारी गायब झाल्यानंतर सोशल मीडियात चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही पोस्टमध्ये ती अर्चना तिवारीसारखी गायब असल्याचे बोलले गेले मात्र पोलिसांनी ही चुकीची माहिती असल्याचे सांगितले. सध्या हे प्रकरण कौटुंबिक वादातून झाल्याचे दिसते, आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. श्रद्धाला शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.
अर्चना तिवारीही १३ दिवसांनी सापडली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंदूरमध्ये न्यायाधीशाच्या परीक्षेची तयारी करणारी अर्चना तिवारीही बेपत्ता झाली होती. कटनी येथे कुटुंबाकडे जाताना ती धावत्या रेल्वेतून अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर पोलिसांना तिचा शोध सुरू केला तेव्हा १३ दिवसांनी स्वत: अर्चना तिवारी समोर आली. तिनेच तिच्या बेपत्ता होण्याचा प्लॅन रचल्याचे तपासात कळले. घरच्यांनी लग्नासाठी दबाव आणला होता, त्यातून अर्चना तिवारीने हा कट रचला. १३ दिवसांनी पोलिसांनी तिला पकडून कुटुंबाच्या स्वाधीन केले होते.