बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:15 IST2025-07-16T06:15:34+5:302025-07-16T06:15:42+5:30
यापूर्वी तिने कुठे प्रवास केला होता व तस्करी केली होती का, याचा तपास अधिकारी करत आहेत.

बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बिस्कीट आणि चॉकलेटच्या बॉक्समधून तब्बल ६० कोटी ६० लाख रुपयांच्या कोकेनच्या तस्करीप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एका भारतीय महिलेला मुंबई विमानतळावर अटक केली आहे. ती दोहा येथून मुंबईत आली होती.
ही महिला अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडे होती. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी संबंधित महिला ज्या विमानाने येणार होती त्या विमानाबाहेर सापळा रचला होता. ही महिला विमानातून उतरल्यानंतर तिच्या लगेजची तपासणी केली असता त्यात बिस्किटांचे सहा बॉक्स आणि तीन चॉकलेटचे बॉक्स सापडले. त्यामध्ये ३०० कॅप्सूलमध्ये ६२६१ ग्रॅम कोकेन लपवले होते.
या तस्करीसाठी या महिलेला मोठी रक्कम मिळणार होती, तसेच मुंबईत उतरल्यानंतर तिला हे अमली पदार्थ घेण्यासाठी एक व्यक्ती संपर्क करणार होती, असे तिने अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितले. दरम्यान, यापूर्वी तिने कुठे प्रवास केला होता व तस्करी केली होती का, याचा तपास अधिकारी करत आहेत.