वसई - अलीकडेच वाळू माफियांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच सध्या देशातच हायअलर्ट असातना सर्रास ही स्फोटके उपलब्ध होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि विरार पोलिसांनी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या घरांवर आणि अड्ड्यावर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली. पोलिसांनी केलेल्या कारावई १२३ जिलेटीनच्या कांड्या, ३४५ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या आणि २१ सेफ्टी फ्जुजचे बंडले जप्त करण्यात आली.
पोलीस ही स्फोटके कुठून आणली, कशा प्रकारे त्यांची विक्री होते याचा शोध घेत आहेत अशी माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. विरारमध्ये सापडलेली स्फोटके ही वाळू उपशाच्या कामासाठी वापरली जात होती. खाडीच्या तळाशी असलेली वाळू स्फोट करून सैल करायची आणि मग ती उपसली जात होती. वाळू उपसाही बेकायदेशीर आणि अवैध्यरित्या स्फोटकांचा वापरही बेकायदेशीर आणि धोकादायक आहे असे विजयकांत सागर यांनी सांगितले. ही स्फोटके विकणाऱ्यांच्या आम्ही शोध घेत असल्याचे ते पुढे म्हणाले.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर सापडलेली स्फोटके घातपात घडविण्यासाठी पुरेसी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्फोटकांचा गैरवापर झाला तर मोठी हानी होऊ शकते असे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कुठलेही स्फोटके बाळगण्यासाठी ठराविक परवान्याची आवश्यकता असते. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात अशी स्फोटके विकली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका टाळण्यासाठी पोलिसांना सतर्क राहणं आवश्यक आहे.