वाराणसी - उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे आईच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी आईने प्रियकरासोबत मिळून १० वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली आहे. आरोपी आईचे ज्या युवकासोबत संबंध होते, त्याच्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत मुलाने पाहिले होते. मुलगा त्याच्या वडिलांना काय सांगेल या भीतीने आईने त्याचा काटा काढायचे ठरवले आणि क्रूरपणे त्याची हत्या केली असं पोलीस तपासात समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, मुलाची हत्या करून आई स्वत: पोलीस स्टेशनला पोहचली. तिने मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा आईचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांना मुलाचा मृतदेह झुडपात सापडला. आईच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आला तेव्हा त्यांनी खाकीचा धाक दाखवला. त्यानंतर आईने तिचा गुन्हा कबूल केला. या महिलेने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून केल्याचे समोर आले.
तर जेव्हा आरोपी युवकाला पोलीस घटनास्थळी घेऊन जात होते, तेव्हा त्याने पोलिसांची पिस्तुल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात आरोपी युवक जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आरोपी युवकाचं नाव फैजान आहे. आई आणि तिचा प्रियकर फैजानने मिळून १० वर्षीय मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी नेत झुडपात फेकून दिला.
दरम्यान, प्राथमिक तपासात हत्येचे मूळ कारण महिला आणि फैजान यांच्यातील अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले आहे. या मुलाने आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले. त्यातून या दोघांनी मिळून त्याचा काटा काढला. त्याच्या हत्येची योजना आधीच बनवली होती असा पोलिसांना संशय आहे. दोघांनी मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर आईने पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याचा बनाव रचला. परंतु तपासात आरोपी महिला आणि फैजानचे संबंध उघड झाले. त्यानंतर या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर सत्य उघड झाले.