VIDEO: पत्नी अन् लेकीची दिवसाढवळ्या रस्त्यावर डोक्यात गोळी झाडून हत्या; स्वत:लाही संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:03 IST2022-04-28T17:53:25+5:302022-04-28T18:03:36+5:30
भररस्त्यात पत्नी, मुलीच्या डोक्यात झाडली गोळी; त्यानंतर स्वत:लादेखील संपवलं

VIDEO: पत्नी अन् लेकीची दिवसाढवळ्या रस्त्यावर डोक्यात गोळी झाडून हत्या; स्वत:लाही संपवलं
पाटणा: बिहारची राजधानी पाटण्यामध्ये दुहेरी हत्याकांड घडलं आहे. भररस्त्यात घटस्फोटित पत्नी आणि मुलीला संपवल्यानंतर व्यक्तीनं स्वत:वर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. अनीसाबाद पोलीस वसाहतीत ही घटना घडली. घटस्फोटित पत्नी आणि मुलीच्या डोक्यात गोळ्या झाडल्यानंतर व्यक्तीनं स्वत:लाही संपवलं.
घटनेची माहिती मिळताच पाटण्याचे एसएसपी पथकासह घटनास्थळी पोहोचले. दुपारी पाऊणच्या सुमारास ही घटना घडल्याचं एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लो यांनी सांगितलं. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचं नाव राजीव कुमार आहे. राजीव कुमारच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं मेहुणी शशीप्रभासोबत विवाह केला.
राजीवला पहिल्या पत्नीपासून संस्कृती नावाची मुलगी आहे. दुसऱ्या पत्नीनं राजीवला घटस्फोट दिला. संस्कृतीला राजीवसोबत राहायचं नव्हतं. त्यामुळे राजीव वैतागला होता. घरगुती वादातूनच राजीवनं शशीप्रभा आणि संस्कृतीला संपवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गुरुवारी दुपारच्या सुमारास राजीवनं भररस्त्यात शशीप्रभा आणि संस्कृतीवर गोळीबार केला. राजीवनं झाडलेल्या गोळ्या दोघांच्या डोक्याला लागल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघी ठार झाल्याचं पाहून राजीवनं स्वत:वरही गोळी झाडली. आता पोलीस राजीवच्या सासूची चौकशी करत आहेत. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्नदेखील सुरू आहे.