अलीकडच्या काळात लग्नाआधीच्या आणि नंतरच्या प्रेम संबंधांमुळे पती आणि पत्नी यांच्यातील रक्तरंजित संघर्ष वाढल्याचं दिसून येत आहे. मेरठमध्ये एकीकडे पतीची हत्या करून ड्रममध्ये सिमेंट टाकून त्याचा मृतदेह गाडला तर काही प्रकरणात टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आले. मात्र बिहारमध्ये घडलेल्या एका प्रकाराने माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका संशयी पतीने ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मुलाचे वडील आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपी पतीला संशय होता. या प्रकरणी पतीला अटक केली असून जखमी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पटना जिल्ह्यातील मसोढी येथे ही घटना घडली आहे. रक्षा बंधनाला आजीच्या घरी आलेल्या मुलासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. या मुलाचे वडील गावचे जावई होते. आरोपी गुड्डू पासवान याला त्याच्या पत्नीचे आणि मुलाच्या वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. परपुरुषासोबत पत्नीचे अफेअर असल्याच्या संशयाने पतीचा राग अनावर झाला. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने गावच्या जावयाच्या मुलावर हल्ला केला. गुड्डू पासवानने मुलाला घरात बोलावून ब्लेडने त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. या घटनेनंतर आरोपीची पत्नी समोर आली नाही.
रक्षा बंधनाच्या दिवशी आईसोबत मुलगा त्याच्या आजीच्या घरी आला होता. गुरुवारी संध्याकाळी मुलाला चॉकलेटचं आमिष दाखवून गुड्डूने त्याच्या घरी नेले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्या रागात त्याने बदला घेण्याचे ठरवले. आरोपी गुड्डूने ब्लेडने मुलाच्या गुप्तांगावर वार केले. या मुलाच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. जखमी अवस्थेतील मुलाला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित मुलाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी गुड्डू पासवानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी गुड्डूला पोलिसांनी अटक केली.
पीडित मुलाचे वडील सासरी राहून मजुरीचं काम करतात. घटनेच्या दिवशीही ते कामावर गेले होते. मुलाची आई घरातील कामात व्यस्त होती. याचवेळी गुड्डूने चॉकलेटचं आमिष दाखवून मुलालासोबत नेले आणि त्याच्यावर हल्ला केला. आरोपी गुड्डू या घटनेनंतर फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली. त्याशिवाय पोलिसांनी घरातून ब्लेड जप्त केले आहे. आरोपीची मानसिक स्थिती कशी आहे त्यावर डॉक्टर तपासणीनंतर रिपोर्ट येईल. मात्र आरोपी पत्नी आणि पीडित मुलाच्या वडिलांमध्ये अफेअर असल्याच्या संशयातून गुड्डूने हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.