आम्हाला ग्रुपमधून का रिमूव्ह केलं? सावत्र भावांनी व्हॉट्स ऍप ग्रुप ऍडमिनला बेदम मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:02 IST2022-04-26T19:01:16+5:302022-04-26T19:02:58+5:30
व्हॉट्स ऍप ग्रुपमधून काढल्यानं सावत्र भावांचा हल्ला; ऍडमिनला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं

आम्हाला ग्रुपमधून का रिमूव्ह केलं? सावत्र भावांनी व्हॉट्स ऍप ग्रुप ऍडमिनला बेदम मारलं
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. व्हॉट्स ऍप ग्रुप ऍडमिननं काही जणांना ग्रुपमधून काढलं. त्यावरून वाद झाला. यानंतर ग्रुपमधून काढण्यात आलेल्या लोकांनी ऍडमिनला मारहाण केली. हल्ला करणाऱ्या व्यक्ती ऍडमिनचे सावत्र भाऊ आहेत. जखमी ऍडमिनवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सावत्र भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहेत. खजराना परिसरात ही घटना घडली आहे.
खजरानातील पटेल नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ३६ वर्षांच्या शादाब खान आणि त्याचा मोठा भाऊ शरीक खानवर त्यांचेच सावत्र भाऊ शाहरुख, शोएब आणि साहिल यांनी दर्गा मैदानात जीवघेणा हल्ला केला. दोघेही भाऊ रक्तबंबाळ झाले. हल्ला केल्यानंतर तिव्ही आरोपी फरार झाले. परिसरात एकच खळबळ माजली. दोन्ही भावांनी कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधत त्यांना घडलेला प्रकार सांगितला. थोड्याच वेळात कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना रुग्णालयात दाखल केलं.
कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. शादाब खान एका व्हॉट्स ग्रुपचा ऍडमिन आहे. त्या ग्रुपमध्ये विविध प्रकारचे मेसेज येतात. त्यावरून शाहरुख, शोएब, साहिल अनेकदा शादाबसोबत वाद घालायचे. आरोपी रोज कोणत्या ना कोणत्या विषयावरून भांडण राहायचे. त्यामुळे वैतागलेल्या शादाबनं तिघांना ग्रुपमधून काढलं. त्यामुळे आरोपी संतापले.
आरोपींनी योजना आखून शादाब खान आणि शरीक खानला दर्गा मैदानात बोलावलं. त्यांच्यावर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आता अचानक मारहाण सुरू झाल्यानं शादाब, शरीक गोंधळले. आरोपींनी दोघांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.