खेरवाडीत पोलिसांना मारहाण, युनिफॉर्मची बटणेही तोडली; गुन्हेगाराला अटक
By गौरी टेंबकर | Updated: February 6, 2024 16:17 IST2024-02-06T16:15:43+5:302024-02-06T16:17:04+5:30
पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३३२, ३५३,४२७,५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

खेरवाडीत पोलिसांना मारहाण, युनिफॉर्मची बटणेही तोडली; गुन्हेगाराला अटक
मुंबई : खेरवाडी पोलिसांना शिवीगाळ व मारहाण करत युनिफॉर्मची बटणे तोडण्याचा प्रकार घडला. याविरोधात मोहम्मद शेख (२७) नामक रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे जो अभिलेखावरील गुन्हेगार आहे.
तक्रारदार शिवाजी सरवदे (३९) हे खेरवाडी पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असून रविवारी रात्री वांद्रे पूर्वच्या संत ज्ञानेश्वर नगरमध्ये सहायक पोलीस निरीक्षक गणेशकर यांच्यासह गस्त घालत होते. त्यावेळी शेख हा अंगावर शर्ट परिधान न करता मोठमोठ्याने ओरडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे चिडलेल्या लोकांनी त्याला हाताने मारहाण करायला सुरुवात केली. जे पाहून सरवदे व गणेशकर हे त्याठिकाणी धावून गेले. त्यांनी शेखला मारहाण करणाऱ्यांना बाजूला सारत तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र त्यानंतर शेखने पोलिसांनाच शिवीगाळ करायला सुरुवात केली.
तसेच त्याला अडवणाऱ्या सरवदे यांची कॉलर पकडून शर्टची बटणे तोडली आणि हाताने मारहाण करू लागला. तेव्हा गणेशकर यांनी त्याला अडवायचा प्रयत्न केला म्हणून त्यांनाही धक्काबुक्की करत शेखने ढकलून दिले. अखेर अतिरिक्त पोलीस मदत मागवत शेखला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर खेरवाडी सह बीकेसी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३३२, ३५३,४२७,५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.