गुजरातच्या अहमदाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची चाकू खुपसून हत्या केली आहे. यामुळे संतप्त जमावाने शाळेत गोंधळ घालत तोडफोड केली आहे.
अहमदाबादमधील खोखरा येथील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. दहावीचा विद्यार्थी नयनवर मंगळवारी नववीच्या विद्यार्थ्याने चाकू हल्ला केला होता. यात नयन गंभीर जखमी झाला होता. त्याला मंगळवारीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्याचा मृत्यू झाला. नयन हा सिंधी समाजाचा होता. त्याच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या सिंधी समाजाच्या शेकडो लोकांनी शाळेसमोर जमायला सुरुवात केली होती. यानंतर इतर संघटनांचे लोकही आले होते. काही हिंदू संघटना, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आत घुसत शाळेची तोडफोड केली. तसेच शाळेच्या कर्मचाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली.
पोलिसांना हा जमाव आवरला नाही, यामुळे जास्त कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी नववीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन असल्याने त्याच्यावर त्या कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. सिंधी समाजाने आरोपी विद्यार्थ्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि संचालकांच्या विरोधातही गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. आरोपी विद्यार्थी हा मुस्लिम समाजाचा असल्याचे सांगितले जात आहे. दोघांमध्ये मांसाहारावरून भांडण झाले होते. यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.