उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाचं १४ वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला २ मुलेही होती परंतु काही कारणानं पती पत्नीत वाद झाला आणि दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला. या युवकाने दुसरं लग्न केले मात्र त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे दुसऱ्या पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाणे गाठले.
युवकाच्या दुसऱ्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून त्यात लग्नावेळी सासरच्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला आणि आता ५ लाख रुपये आणि बुलेटची मागणी करत आहेत. इतकेच नाही तर माझ्या भावाच्या लग्नातही मला जाऊ दिले नाही. माझ्याकडील दागिने काढून घेतले. त्याशिवाय पहिल्या पत्नीसोबत सामंजस्याने राहण्यासाठी मला मारहाण केली जाते. माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप तिने केला आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.
माझे पती राजीव तिवारी यांचं १४ वर्षापूर्वी कविता नावाच्या युवतीसोबत लग्न झाले होते. त्या दोघांना १३ आणि ८ वर्षाचा मुलगा आहे. मात्र दोघांमध्ये झालेल्या वादानंतर सहमतीने घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर राजीव यांच्या कुटुंबाने नातेवाईकांच्या मध्यस्थीने आमचे लग्न लावून दिले. राजीव यांचं पहिलं लग्न झाले होते परंतु घटस्फोट झाल्याने आम्ही लग्नाला तयार झालो. २३ एप्रिल २०२४ रोजी लग्न धूमधामपणे करण्यात आले. माझ्या आनंदासाठी वडिलांनी जमीन विकून २५ लाखाहून अधिक खर्च लग्नात केला. हुंडा दिला जेणेकरून मला सासरी त्रास होऊ नये असं पूजा तिवारीने पोलिसांना सांगितले.
लग्नानंतर काही महिने सुरळीत चालले होते. सर्व माझी काळजी घेत होते परंतु वेळेसोबत परिस्थिती बदलली. राजीव यांची पहिली पत्नी कविताने माझ्या पतीशी पुन्हा जवळीक साधली. मुलांना भेटण्याच्या बहाण्याने ती वारंवार घरी येत होती. मी जेव्हा याचा विरोध केला तेव्हा पतीने मलाच शिवीगाळ केली, त्याबाबत सासरी तक्रार केली तर सर्वच नाराज झाले. एकेदिवशी सासूसासरे, दिर, पती आणि त्याची पहिली पत्नी कविता यांनी मिळून मला मारहाण केली. जर तू विरोध केला तर तुला घरातून काढून टाकू अशी धमकी पूजाला दिली. २२ नोव्हेंबरला पूजाच्या भावाचं लग्न होते त्या कार्यक्रमालाही घरच्यांनी जाऊन दिले नाही. मला ५ लाख रुपये आणि एक बुलेट मागितली असा आरोप दुसऱ्या पत्नीने केला. दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सध्या पोलीस तपास करत आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.