उत्तर प्रदेशातील बरेली इथं एका युवकाने केलेल्या फसवणुकीची सगळीकडे चर्चा आहे. स्वत:ला पोलीस अधिकारी म्हणवणाऱ्या युवकाने एक दोन नव्हे तर तब्बल ५ लग्न केली. मात्र जेव्हा त्याची पोलखोल झाली तेव्हापासून तो फरार आहे. सध्या पोलीस या युवकाचा शोध घेत आहेत.
नवाबगंज परिसरात एक युवक सगळ्यांना तो पोलीस असल्याची बतावणी करायचा. त्यातूनच त्याने पाचवे लग्न केले. या लग्नानंतर नववधू जेव्हा तिच्या सासरी पोहचली तेव्हा तिथलं सत्य समोर येताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठत सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आणि तक्रार नोंद करून घेतली. या युवकाने लग्नाआधी तिच्या वडिलांकडून अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोपही पत्नीने केला.
पीडितेनुसार, लग्नानंतर जेव्हा ती सासरी पोहचली तेव्हा तिच्या पतीचं याआधीच चार लग्न झाल्याचं सत्य उघड झाले. परंतु हे तिच्यापासून लपवण्यात आलं होते. त्याशिवाय तो पोलीस अधिकारीही नव्हता. जेव्हा हे सगळं नववधूसमोर आलं तेव्हा तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आले. या गोष्टीचा विरोध सुरू केला असता सासरच्यांनी तिला मारहाण करून घरातून बाहेर काढलं असं तिने पोलीस तक्रारीत सांगितले.
युवकाने आधीच ४ लग्न केलीत तेव्हा पाचव्या पत्नीने त्याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची आणखी माहिती घेतली. त्यात चारही पत्नीने युवकाविरोधात कोर्टात खटला दाखल केल्याचं समोर आले. सध्या चारही पत्नी वेगवेगळ्या राहतात. एक पत्नी गाझियाबाद, दुसरी क्लोलडिया, तिसरी आणि चौथी पत्नी बीसलपूर हद्दीत राहणाऱ्या आहेत. आरोपीने स्वत:ला तो पोलीस अधिकारी असल्याचं सांगितले, त्याशिवाय पोलिसांसारखा धाकही इतरांवर दाखवायचा असं फसवणूक झालेल्या युवतीने सांगितले.
दरम्यान, माझ्या घरच्यांना खरेच तो पोलिसात असल्याचं वाटले, त्यामुळे त्याच्याशी माझं लग्न केले. हुंड्यात त्याने अडीच लाख रुपयेही घेतले. परंतु बोगस नवऱ्याचं सत्य बाहेर आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला न्याय हवा अशी मागणी तिने पोलिसांकडे केली. सध्या आरोपी युवक फरार असून आम्ही गुन्हा नोंदवून घेतला आहे. लवकरच आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले जाईल. त्यानंतर नेमकं यामागचं सत्य काय हे कळेल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.