दिशा सालियन मृत्यू प्रकरण: वडिलांनी केलेल्या याचिका प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 14:18 IST2025-03-23T14:14:21+5:302025-03-23T14:18:04+5:30
सुशांत सिंगच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी दिशाचा तिच्या राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता

दिशा सालियन मृत्यू प्रकरण: वडिलांनी केलेल्या याचिका प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणाची नव्याने चौकशी व्हावी, यासाठी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात २ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. सुशांत सिंग राजपूतचा १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी मृत्यू होण्याच्या सहा दिवस आधी, ८ जून २०२० रोजी मालाड येथे त्याची २८ वर्षीय माजी मॅनेजर दिशाचा तिच्या राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या याचिकेद्वारे उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध जानेवारी २०२४ मध्ये वकील रशीद खान पठाण यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश द्यावेत आणि तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सुरुवातीला वडिलांना असे वाटले होते की, केलेली चौकशी खरी आहे, परंतु आता त्यांना कळले की आरोपींना पाठीशी घालण्यासाठी तपास करण्यात आला, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला. दिशाच्या मृत्यूच्या वेळेची परिस्थिती संशयास्पद होती. तरीही निष्पक्ष तपास करण्याऐवजी पोलिसांनी फॉरेन्सिक पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी विचारात न घेता, घाईघाईने हे प्रकरण आत्महत्या म्हणून बंद केले. हा तपास म्हणजे आरोपींना सोडण्यासाठी नसून त्यांना पाठीशी घालण्यासाठी होता, असे याचिकेत म्हटले आहे.