बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे चार महिने झाले असतानाच एका नवविवाहित वधूने आत्महत्या केली आहे. आपल्या पतीचे त्याच्याच मावशीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
नेमकं काय घडलं?
मृत नवरीचे नाव मौसम असून ती माहपूर येथील रहिवासी होती. तिचे लग्न ५ मे रोजी लौना गावातील अजय तांती सोबत झाले होते. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांनी तिने गळफास लावून आत्महत्या केली. मौसमच्या माहेरच्या लोकांचा आरोप आहे की, तिचा पती अजयचे त्याच्या मावशीसोबत अनैतिक संबंध होते. विशेष म्हणजे अजयच्या मावशीलाही चार मुले आहेत.
जेव्हा मौसमला या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाली, तेव्हा तिने याला विरोध केला. मात्र, अजयने तिच्याकडे दुर्लक्ष करत "मी मावशीला सोडणार नाही, तुला जे करायचे ते कर" असे स्पष्टपणे सांगितले. यानंतर, सासरच्या लोकांनी तिला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळेच मौसमने हे भयानक पाऊल उचलले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते!
मृत महिलेची आई बबिता देवी यांनी सांगितले की, जावई अजय त्यांच्या मुलीला मारहाण करत होता आणि हुंड्याची मागणीही करत होता. लग्नात सुमारे सहा लाख रुपये रोख आणि इतर वस्तू दिल्या असूनही तो समाधानी नव्हता. बबिता देवींच्या म्हणण्यानुसार, अजय नेहमी म्हणायचा, "तू मला आवडत नाहीस, तू मरून जा. मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते." या गोष्टीला कंटाळून मौसमने आपल्या माहेरी साडीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केली.
पुढील तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तारापूर पोलीस ठाण्याचे प्रमुख राजकुमार यांनी सांगितले की, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंगेरच्या सदर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांकडून लेखी तक्रार मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही केली जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.