राजस्थानच्या कोटा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने भरदिवसा तिच्या नातेवाईकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. ही घटना बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपीचे नाव चंद्रप्रकाश कुशवाह असून, तो एक शेतकरी आहे. तर, मृत व्यक्तीची ओळख दीपक कुशवाह म्हणून झाली आहे. दीपक हा बारन जिल्ह्यातील खयावदा गावाचा रहिवासी असून, तो सिम पोर्टिंगचे काम करत होता. चंद्रप्रकाशला संशय होता की, त्याची पत्नी रेखाचे दीपकसोबत अनैतिक प्रेमसंबंध आहेत.
शनिवारी सकाळी, चंद्रप्रकाश आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी कोटा येथे आला होता. याचवेळी त्याने पत्नीच्या घरात तिच्या कथित प्रियकराला बसलेले पाहिले. यामुळे संतापलेल्या चंद्रप्रकाशने रागाच्या भरात दीपकवर चाकूने सपासप वार केले.
यावेळी, भांडण सोडवण्यासाठी आरोपीची पत्नी आणि सासू मध्ये पडल्या. तेव्हा चंद्रप्रकाशने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दीपकसह आरोपीची पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच बोरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिन्ही जखमींना तातडीने एमबीएस रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू
रुग्णालयात उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला. तर, आरोपीची पत्नी आणि सासू यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी चंद्रप्रकाशविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास करत आहेत.