Husband murdered Wife | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची केली हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची केली हत्या

मीरा रोड : चारित्र्याच्या संशयावरून नासीर रईस खान (२८) याने आपली पत्नी शमीम खान (२६) हिची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर नासीरने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीस बहिणीकडे सोडले व नंतर तिला फोन करून पत्नीची हत्या केल्याचे कळवले. पोलीस फरार नासीरचा शोध घेत आहेत.
दर्शन इमारतीत राहणारा नासीर खान याने मंगळवारी सकाळी साडेतीन वर्षांच्या मुलीस आपल्या बहिणीच्या घरी सोडून दुकानात जातो, असे सांगून निघून गेला. सायंकाळी त्याने बहिणीला फोन करून, आपण पत्नी शमीम खान हिची हत्या केल्याचे बहिणीला कळवले. यामुळे बहिणीने थेट नयानगर पोलिसांना प्रकार सांगितला.
पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला असता शमीमचा मृतदेह आढळून आला. घरातील भिंतीवर नासीर याने ‘शमीमच्या मोबाइलमध्ये दीपक ठाकूरचे फोटो आहेत’ असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे चारित्र्याच्या संशयावरून नासीरने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नासीरचे रामदेव पार्क भागात मोबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद होत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सोमवारी रात्री नासीर हा पत्नी व मुलीसोबत इमारतीच्या आवारात बसला होता. मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास नासीर मुलीला घेऊन इमारतीबाहेर पडला.

Web Title: Husband murdered Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.