बिजनौर - जिल्ह्यातील किरतपूर इथं हैराण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी मेरठच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. २८ एप्रिलच्या संध्याकाळी रामपूर गावातील शेतकरी त्यांच्या शेतात काम करत होते तेव्हा अचानक गोळीबाराचा आवाज ऐकायला आला. शेतकऱ्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिले. या युवकाला गोळी लागली होती.
या युवकाची ओळख पटली नाही कारण त्याचा चेहरा दगडाने ठेचला होता. गळ्यावर आणि चेहऱ्यावर पिवळा कपडा बांधून मृतदेह झुडुपात फेकला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर मृतकाचं नाव मोहम्मद फारूक असून तो बिजनौरचा रहिवासी होता हे समोर आले. तपासात शेतकऱ्यांनी सांगितले की, मोटारसायकलवरून ३ तरूण आले होते परंतु फायरिंगनंतर त्यातील दोघे परत गेले. तेव्हा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात हे तिघे मोहम्मद फारूक, मेहरबान आणि उमर अशी त्यांची नावे कळली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा मेहरबान आणि उमरने मोहम्मदला त्यांच्यासोबत नेले असं कुटुंबाने सांगितले. त्यानंतर फारूकच्या हत्येची बातमी मिळाली त्याने कुटुंबाला धक्का बसला. या गोंधळात नातेवाईक हॉस्पिटलला पोहचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. या प्रकरणी मृत युवकाच्या मोठ्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सर्वात आधी मेहरबान आणि उमर यांचा मोबाईल ट्रेस केला. त्यानंतर त्यांचे लोकेशन कळताच सापळा रचून दोघांना अटक केली. यावेळी उमरने पोलिसांवर गोळीबार केला त्यात एक शिपाई जखमी झाला.
प्रेमसंबंधातून झाली हत्या
मोहम्मद फारूकच्या पत्नीचे प्रेम संबंध त्यातून ही हत्या झाल्याचे कारण समोर आले. आरोपी मेहरबानने पोलीस चौकशीत सांगितले की, मागील ५ वर्षापासून फारूकच्या पत्नीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. त्यावेळी फारूक सौदी अरबमध्ये नोकरी करत होता. फारूक परतला तेव्हा त्याला पत्नीच्या अफेअरबाबत कळले. त्याने पत्नी अमरीनला मारहाण केली. तिला बाहेर जाण्यापासून रोखले. त्यामुळे मेहरबानने अमरीन आणि मित्र उमरसोबत मिळून फारूकचा काटा काढायचा असं प्लॅनिंग केले.
प्लॅनिंगनुसार, मेहरबान आणि उमर २८ एप्रिलला संध्याकाळी फारूकला घरातून बिअर पाजण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. गावातील नदी किनारी शेतात त्याला गोळी झाडून ठार केले. आरोपींनी मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचला. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून ३१५ बोर बंदुक, ४ जिवंत काडतूस जप्त केलेत. या प्रकरणी मोहम्मद फारूकची पत्नी अमरीनलाही ताब्यात घेण्यात आले आहे.