आठ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. पण, पत्नी आजारी पडली आणि पतीने एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले. इतकंच काय तो तिच्यासोबत पळून गेला. पोलिसांनी दोघांना पकडले. त्यानंतर काही दिवसांत पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे समोर आले. तो तिच्यासोबतही पळून गेला. त्यामुळे आजारी महिला नैराश्यात गेली आणि तिने आत्महत्या केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लहचुरा पोलीस ठाणे हद्दीतील गढवा गावातील एका व्यक्तीच्या पत्नीने आत्महत्या केली. ३० वर्षीय विवाहिता मीनाचा मृतदेह घरातील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
माहिती मिळताच पोलीस घरी गेले आणि मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आत्महत्या
मयत महिलेच्या वडिलांनी सांगितले की, मीनाचे ८ वर्षांपूर्वी अनिल वंशकारसोबत लग्न झाले होते. लग्नानंतरच तिला सासरच्यांकडून त्रास देणं सुरू झालं. हे प्रकरण पंचायतीसमोर गेले, त्यानंतर थोडी परिस्थिती सुधारली. पण, अनिलचे गावातील महिलेसोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले.
अनिल त्या महिलेसोबत पळून गेला. या प्रकरणी गुसराय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तपास घेतला आणि त्या दोघांना पकडले. त्यानंतर अनिल वंशकार २४ एप्रिल रोजी पुन्हा गावातीलच दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला.
सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला मीना मृतदेह
मयत मीनाचे सासरे धनाराम यांनी माहिती दिली की, रात्री आम्ही सगळे जेवलो आणि झोपी गेलो. जेव्हा सकाळी मोठी सून उठली, तेव्हा तिला मीनाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याची पोलिसांना माहिती दिली. अनिल ज्या महिलेसोबत फरार झाला आहे, तिच्या घरचेही आमच्या घरी आले होते.
मयत मीना गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तिला टीबीचा आजार आहे. पण, पतीच्या विवाहबाह्य प्रकरणामुळे ती नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले.