जालना - एका भोंदूबाबाने तुझी मुलगी माझीच आहे, ती मला द्या, अन्यथा पाच ते दहा लाखांचा मानहानीचा दावा करेन, अशा धमक्या देत आहे. या त्रासाला कंटाळून वालसा वडाळा इथं राहणाऱ्या ज्ञानेश्वर आहेर या ३० वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गावच्या शिवारात घडली.
या प्रकरणात भोंदूबाबा असलेल्या धामनगाव येथील गणेश दामोदर लोखंडे याच्याविरोधात ४ मार्च रोजी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी आहेर यांच्या खिशात भोंदूबाबा गणेश लोखंडे याच्या नावाचा उल्लेख असणाऱ्या लेखी चिठ्या सापडल्या. त्यानंतर मयताच्या पत्नीने याची भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार केली. फिर्यादी महिला आणि तिचा पती देवदर्शनासाठी धामनगाव इथल्या मंदिरात गेले होते. त्यावेळी भोंदूबाबा गणेश लोखंडेसोबत ओळख झाली. तेव्हापासून लोखंडे फिर्यादी महिलेला वाईट नजरेने लेखी चिठ्ठीद्वारे व फोनवर संपर्क करून त्रास दिला.
तुझी मुलगी माझीच आहे. ती मला पाहिजे, अन्यथा मी तुमच्यावर ५ ते १० लाखांचा मानहानीचा दावा दाखल करेन अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी लोखंडेविरुद्ध ४ मार्च रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने गणेश लोखंडे याला एका मठातून ताब्यात घेतले आहे.