एका व्यक्तीचा त्याच्या पत्नीशी प्रचंड वाद झाला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नाकाचा चावा घेतला आणि नाकाचे दोन तुकडे करून टाकले. विद्या असे ३० वर्षीय महिलेचे नाव असल्याचे समजते आणि सध्या ती शिवमोगा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना ८ जुलै रोजी दुपारी घडली. दोघेही दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातील मंतरघट्टा गावातील रहिवासी आहेत. नेमका कशावरून घडला वाद, जाणून घेऊया.
विद्या आणि तिचा पती विजय यांच्यात कर्ज फेडण्यावरून भांडण सुरु झाले. वाद प्रचंड वाढला. हाणामारीदरम्यान विद्या जमिनीवर पडली आणि विजयने तिचे नाक चावले, ज्यामुळे तिच्या नाकाचा पुढचा भाग कापला गेला. स्थानिकांनी हस्तक्षेप करून विद्याला शिवमोगा येथील मेगन रुग्णालयात नेले, तेथून तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. विद्याच्या तक्रारीवरून, शिवमोगा येथील जयनगर पोलिस ठाण्यात मेडिको-लीगल केस (MLC) दाखल करण्यात आली आणि नंतर दावणगेरे येथील चन्नागिरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मे महिन्यात उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही अशीच एक घटना घडली होती. कार पार्किंगवरून झालेल्या वादात एका व्यक्तीने निवासी सोसायटीच्या सचिवाचे नाक कापले होते. ही घटना नारामऊ परिसरातील रतन प्लॅनेट निवासी सोसायटीमध्ये घडली. तिथे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि व्यापारी राहतात. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले होते की, टोकाच्या वादानंतर क्षितिज मिश्राने निवासी सोसायटीचे सचिव आरएस यादव यांना अनेक वेळा फटके मारले. नंतर त्यांचे नाक इतके जोरात चावले की त्यांच्या नाकाचा तुकडा पडला.