Hospitality enjoyed and the girl fled | पाहुणचार झोडला अन् मुलीला पळविले
पाहुणचार झोडला अन् मुलीला पळविले

ठळक मुद्देयुपीतील भाच्याविरुद्ध मामांची तक्रार : नागपुरातील धंतोलीत अपहरणाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीचा मुहूर्त साधून मामांकडे आलेल्या उत्तर प्रदेशातील एका भाच्याने मनसोक्त पाहुणचार झोडला अन् नंतर मामाची १४ वर्षीय मुलगी पळवून नेली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी ही घटना घडली.
अपहृत मुलगी धंतोलीत राहते. तिचे वडील प्रॉपर्टी डीलर आहे. त्यांची बहीण उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात लखाटा येथे राहते. तिचा मुलगा गुड्डू लालप्रताप सिंग (वय २६) धंतोलीतील मामांकडे दिवाळीनिमित्त आला. मामांच्या १४ वर्षीय मुलीसोबत काही महिन्यांपूर्वीपासून तो ऑनलाईन संपर्कात होता. त्यांच्यातील ऑनलाईन प्रेम फुलल्याची घरच्यांना शंका येण्याचे कारण नव्हते. त्यामुळे तो नागपुरात आल्यानंतर कसलीही कुणी शंका घेतली नाही. त्याची मामा-मामीने चांगली सरबराई केली. इकडे मामांच्या १४ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्याची गुड्डूने पूर्ण तयारी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी मुलीने आपले कपडे एका बॅगमध्ये भरले अन् ती बॅग एका मैत्रिणीच्या घरी नेऊन ठेवली. सोबत घरातून रक्कमही घेतली. दुपारी ३ च्या सुमारास गुड्डू आणि मामांची मुलगी फिरायला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडले. रात्र झाली तरी ते परतले नाही. त्यामुळे मामा-मामींनी त्यांच्यासोबत संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. त्यानंतर धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. भाच्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुड्डूने त्याच्या गावाकडे पलायन केले असावे, असा संशय आहे. त्यामुळे धंतोली पोलिसांचे पथक तिकडे मुलीचा शोध घेण्यासाठी जाणार आहे.


Web Title: Hospitality enjoyed and the girl fled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.