Crime News: एका २५ वर्षीय विद्यार्थ्यांने रंग लावण्यास विरोध केला. रंग लावू देत नाही म्हणून राग आलेल्या तिघांनी त्याला मारहाण केली. शासकीय ग्रंथालयात घुसलेल्या या विद्यार्थ्याला तिघांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा जागेवरच जीव गेला. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. ग्रंथालयाबाहेरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मृतदेह ठेवून आरोपींच्या अटकेची मागणी केली. तब्बल आठ तास निदर्शने सुरू होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात असलेल्या रामावास गावात ही घटना घडली आहे. गावात शासकीय ग्रंथालय आहे. धुळवडीच्या दिवशीही काही विद्यार्थी ग्रंथालयात अभ्यास करत होते. विद्यार्थी बाहेर रंग खेळत होते. याचवेळी २५ वर्षीय विद्यार्थी हंसराज मीणा बाहेर गेला.
त्यावेळी तीन भाऊ त्याला रंग लावण्याचा प्रयत्न करत होते. त्याने विरोध केला. तिघांनी हंसराज मीणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. हंसराज ग्रंथालयात घुसला. त्यानंतर तिघे आणि इतरही तरुण आले. त्यांनी हंसराजला मारहाण केली. हंसराजचा गळा दाबून ठेवला. इतरांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. हंसराज खाली कोसळला. त्याला तातडीने लालसोट येथील रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हंसराज मृतदेह ठेवला रस्त्यावर
हंसराजच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह जबरदस्ती रुग्णालायतून आणला. यावेळी पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर मृतदेह ग्रंथालयासमोरील रस्त्यावर ठेवला.
आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत रास्ता रोको करण्यात आला. तब्बल आठ तास कुटुंबीय आणि ग्रामस्थ रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तरुणांची ओळख पटली, पोलिसांकडून शोध सुरू
सहायक पोलीस अधीक्षक दिनेश अग्रवाल यांनी घटनेबद्दल माहिती दिली. हंसराज माणी याची ग्रंथालयात गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी सहा विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. अशोक, कालुराम आणि बबलू अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, असे अग्रवाल यांनी सांगितले.