समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:19 IST2025-07-10T06:19:10+5:302025-07-10T06:19:43+5:30
याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याच रात्री राहुल आणि सबा सीएच्या घरी थडकले. मुलाच्या समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली.

समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
मुंबई : ‘आई, मला माफ कर, तुला या वयात एकटे सोडून जातोय...’ वाकोल्यातील एका ३२ वर्षीय चार्टर्ड अकाैंटंटने (सीए) लिहिलेले हे अखेरचे वाक्य. समलैंगिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुणाने आपले जीवन संपवले. धक्कादायक म्हणजे, बदनामीच्या भीतीने त्याने आतापर्यंत ब्लॅकमेलर्सना तब्बल अडीच कोटी रुपये दिले होते. या प्रकरणात वाकोला पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे पण गेल्या काही दिवसांत समलैंगिक संबंधातून आत्महत्या आणि हत्यांच्या घटनांनी मुंबईत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
वाकोला परिसरात ६५ वर्षीय आईसोबत राहणारा हा सीए मुंबईतील एका नामांकित कंपनीत होता. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सबा कुरेशी आणि राहुल पारवानी या दोघांना अटक केली. घरातील दागिने गायब झाल्याने आईने मुलाकडे चौकशी केली असता, राहुल पारवानीच्या सांगण्यावरून ते गहाण ठेवल्याचे त्याने सांगितले. मुलाने घेतलेली गाडीही पारवानी वापरत होता; पण हप्ते थकल्याने ७ जून रोजी त्याने ती गाडी परत आणली. याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याच रात्री राहुल आणि सबा सीएच्या घरी थडकले. मुलाच्या समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली.
सप्टेंबर २०२४ मध्ये राहुलशी सीएची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, त्यांच्यातील संबंधांनंतर राहुल आणि सबाने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळण्यास सुरुवात केली, असे मुलाने आईला सांगितले. अखेर ६ जुलै रोजी या अत्याचाराला कंटाळून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या वेगवेगळ्या सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.
...काकानेच भाच्याला पाजले विष
१६ वर्षीय भाच्यासोबत असलेल्या समलैंगिक संबंधातून १९ वर्षीय चुलत काकानेच त्याला कोल्ड्रिंकमधून कीटकनाशक दिल्याचे शिवाजीनगर पोलिसांच्या तपासात नुकतेच उघडकीस आले आहे. दोघांच्या मैत्रीला घरच्यांचा विरोध असल्याने त्यांच्यातील नाते तुटले होते. याच कारणातून त्याने २९ जून रोजी हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.
...म्हणून १२ वर्षांच्या मुलाची हत्या
वडाळा येथील एका १२ वर्षीय मुलासोबत असलेल्या समलैंगिक संबंधांबाबत वाच्यता होण्याची भीती आरोपी बिपुल सिकारीला (३९) होती. याच भीतीपोटी त्याने त्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचे वडाळा टीटी पोलिसांच्या तपासात समोर आले होते. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यातून कोरोनाकाळात पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याची वडाळ्यातील या अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यांच्यात समलैंगिक संबंध निर्माण झाले होते. २८ जानेवारी २०२४ रोजी घरी यायला उशीर झाल्यामुळे, घरी आई रागावली तर सर्व काही खरं सांगेन, असे अल्पवयीन मुलाने म्हटले. यामुळे अटकेच्या भीतीने सिकारीने मुलाचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.