कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एचआयव्ही झाल्याने एका २३ वर्षीय तरुणाची त्याच्यात बहिणीने हत्या केली. मल्लिकार्जुन असं या तरुणाचं नाव असून तो चित्रदुर्ग जिल्ह्यातील दुम्मी गावचा रहिवासी होता. त्याची बहीण आणि तिच्या नवऱ्याने बदनामीच्या भीतीने या तरुणाचा काटा काढला. या प्रकरणात पोलिसांनी निशाला अटक केली आहे, तर तिचा पती मंजूनाथ फरार आहे.
मल्लिकार्जुन एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर बहिणीने त्याची गळा दाबून हत्या केली. याच्या आजाराबद्दल कळताच गावात आपली बदनामी होईल अशी तिला भीती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन त्याच्या पालकांसोबत दुम्मी गावात राहत होता. तो बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता आणि अनेकदा कुटुंबाला भेटायला येत असे. २३ जुलै रोजी मित्राच्या गाडीने गावी परतत असताना, त्याची गाडी ट्रकला धडकली, ज्यामुळे मल्लिकार्जुन गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा मित्रही जखमी झाले.
मल्लिकार्जुनला आधी चित्रदुर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढील उपचारांसाठी त्याला दावणगेरे येथील एका खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आलं, जिथे सर्जरीपूर्वी ब्लड टेस्ट केल्य़ावर डॉक्टरांना जखमी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. ऑपरेशन दरम्यान त्याच्या पायात रॉड देखील घालण्यात आला होता, परंतु नंतर जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी कुटुंबाला त्याला मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
निशाने भावाला बंगळुरू येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. वडील नागराजप्पा यांनी निशा आणि तिच्या पतीला पुढील उपचारांसाठी मल्लिकार्जुनसोबत बंगळुरूला जाण्याची विनंती केली. २५ जुलै रोजी संध्याकाळी निशाने तिच्या वडिलांना सांगितलं की ते मल्लिकार्जुनला बंगळुरूला घेऊन जात आहेत. पण ते नंतर त्याचा मृतदेह घेऊन परतले. मल्लिकार्जुनचा रस्त्यात अचानक मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला.
नागराजप्पा यांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या मुलीला आणि जावयाला याबाबत विचारले. निशाने त्यांना सांगितलं की मल्लिकार्जुनने तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं आणि कर्जबाजारी असल्याचं देखील कबूल केलं होतं. त्यानेच मरण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून त्याची हत्या केली. एचआयव्ही एड्सच्या संसर्गामुळे कुटुंबाची बदनामी झाली आहे आणि जर त्याचा मृत्यू झाला नसता तर त्याच्या पालकांनाही संसर्ग झाला असता असं बहिणीला वाटत होतं.