MP Accident:मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत मोठा गोंधळ घातला. काळ्या काचा लावलेली कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने १५ हून अधिक लोकांना धडक केली. या अपघातात त्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावरच त्याने गाडी घातली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक पोलिस कर्मचारी, एक महिला आणि स्कूटर चालवणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश आहे. पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा लष्करातील सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाचा मुलगा आहे. ११ सप्टेंबर रोजी तो झेड ब्लॅक ग्लास असलेल्या बलेनो कारमधून बजरियाहून पाडव चौराहा मार्गे गोलाच्या मंदिराकडे जात होता. यावेळी त्याची ३ वर्षांची भाचीही गाडीत होती. संध्याकाळी ६ वाजता रोडवेज चौराहा येथे ट्रॅफिक कॉन्स्टेबल अतुल शर्मा यांनी त्याला थांबवले तेव्हा त्याने गाडीचा वेग वाढवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबवण्याऐवजी अल्पवयीन मुलाने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली ज्यामुळे तो बोनेटवर लटकला. मुलाने ताशी ६० किमी वेगाने सुमारे १० मीटर पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले.
वाटेत अचानक त्याने स्कूटर चालवणाऱ्या अनुप सक्सेना नावाच्या व्यक्तीला धडक दिलली. त्यानंतर, थोड्या अंतरावर त्याने स्कूटरवरील सरोज कुमारीसह इतर अनेक वाहनांना धडक दिली. यानंतर दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने हुशारी दाखवत कशीतरी गाडी थांबवली. त्यानंतर अल्पवयीन मुलाला गाडीतून बाहेर काढून पकडण्यात आले. त्यानंतर लोकांनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली. पोलिसांनी कसे तरी त्याला लोकांपासून वाचवले आणि पोलीस ठाण्यात आणले.
"मी आणि कॉन्स्टेबल अतुल शर्मा रोडवेज क्रॉसिंगवर ड्युटीवर होतो. संध्याकाळी ६ वाजता एक बलेनो कार आली. गाडीवर काळी फिल्म लावलेली होती. आम्ही गाडी थांबवण्यासाठी पुढे आलो. आम्हाला पाहून ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. अतुल गाडी थांबवण्यासाठी पुढे आला तेव्हा ड्रायव्हरने गाडी अतुलवर चढवली. अतुल बोनेटवर लटकला होता. ड्रायव्हरने ६० किमी वेगाने गाडी चालवली आणि स्कूटर आणि बाईकसह सुमारे ८-१० वाहनांना धडक दिली. ड्रायव्हर एक किलोमीटरपर्यंत समोरून येणाऱ्या प्रत्येकाला धडक देत होता. अतुल सुमारे ३०० मीटरपर्यंत बोनेटवर लटकला होता. मी त्याचा गाडीत पाठलाग केला. खूप प्रयत्नांनंतर, आम्ही त्याला एलएनआयपीई कॉलेजजवळ गाडीला थांबवू शकलो. गाडी थांबताच गर्दी जमली. लोकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. अतुलच्या पायाला, डोक्याला आणि शरीराच्या अनेक भागांना खोल जखमा झाल्या आहेत. कारच्या धडकेत सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर आहे," असं पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.
जखमी पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला, डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना खोल जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाचे मांस निघाले आहे. अपघातामुळे जखमी महिला सरोज शर्मा खाली पडल्या आणि चाक त्यांच्या पायवरून गेले होते. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.