उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. मुंडापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर तिच्याच बहिणीच्या नवऱ्याने तब्बल आठ महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचा पती दुबईत नोकरीला असल्याने आरोपीने याच गोष्टीचा फायदा घेत आधी त्यांच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले आणि नंतर व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून तिचे शोषण केले.
काय आहे नेमके प्रकरण?
पीडित महिलेचा पती आठ महिन्यांपूर्वी दुबईमध्ये नोकरीसाठी गेला होता. पतीच्या अनुपस्थितीत आरोपी भावोजी महिलेच्या घरी येत-जात होता. हळूहळू त्याने कुटुंबातील लोकांचा विश्वास संपादन केला आणि याच दरम्यान एक दिवस संधी साधून बाथरूममध्ये छुपा कॅमेरा लावला. या कॅमेऱ्यात त्याने स्वतःच्या मेहुणीचाच अंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
या अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून आरोपीने मेहुणीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. यामुळे भयभीत झालेली महिला आठ महिने हे अत्याचार सहन करत राहिली.
पती परतल्यावर फुटला टाहो
पती नोकरी करून दुबईतून परतल्यानंतर त्याला पत्नीच्या वागणुकीत मोठा बदल जाणवला. वारंवार विचारणा केल्यावर पीडितेने रडत रडत आपली आपबीती सांगितली. पत्नीची भयानक कथा ऐकून पतीला मोठा धक्का बसला. त्याने तातडीने पत्नीला घेऊन मुंडापांडे पोलीस ठाणे गाठले आणि भावोजीविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यात बलात्कार आणि आयटी ॲक्टच्या कलमांचा समावेश आहे. आरोपी रामपुरच्या टांडा भागातील असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्यासाठी मोबाईल डेटा आणि डिजिटल पुराव्यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.