देशभरात ‘प्रोफेसर’ गँगचे हायटेक जाळे, ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा
By योगेश पांडे | Updated: May 16, 2024 00:27 IST2024-05-16T00:27:09+5:302024-05-16T00:27:49+5:30
शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा : अनेक शहरांत तक्रारी दाखल

देशभरात ‘प्रोफेसर’ गँगचे हायटेक जाळे, ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा
(ट्रेडिंगचा भुलभुलय्या भाग-१)
नागपूर : मागील काही कालावधीपासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही सायबर गुन्हेगारांनी एकत्रित येत तयार केलेल्या एका मोठ्या रॅकेटमध्ये देशातील अनेक नागरिक अडकले असून त्यांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांमध्ये ही टोळी ‘प्रोफेसर गँग’ म्हणून ओळखली जाते. ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली देशभरात हा गोरखधंदा सुरू आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या टोळीच्या काही एजंट्सने सुरू केलेल्या एका ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’मध्ये प्रवेश मिळविला व तेथून या गुन्हेगारांची संपूर्ण ‘मोडस ऑपरेंडी’ समोर आली आहे.
देशभरातील विविध शहरांमध्ये बसून हे सायबर गुन्हेगार हे रॅकेट संचालित करतात. सोशल माध्यमांवरून ते शेअर मार्केट ट्रेडिंगच्या टीप्स देण्याच्या नावाखाली जाहिरात करतात. एकदा का लोकांनी त्यावर क्लिक केले की ते व्हॉट्सअॅप ग्रुपला जोडले जातात. या ग्रुपच्या माध्यमातून मग फसवणुकीचा ‘गेम’ सुरू होतो. सुरुवातीला गुंतवणूकदारांना खरोखर टीप्सदेखील दिल्या जातात व त्यांचा हजारो काय अगदी लाखांचा फायदादेखील करवून दिला जातो.
एकदा का गुंतवणूकदारांना या ग्रुपमधील टीप्सची सवय झाली की हळूच ‘ब्लॉक ट्रेडिंग’चे गोंडस नाव समोर करत आमिष दाखविले जाते. कमी किमतीत कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्याच्या नावाखाली हा प्रकार संचालित करण्यात येतो. गुंतवणूकदाराला आपण कधी गुन्हेगारांच्या जाळ्यात फसलो आहे याची कल्पनादेखील येत नाही. ‘लोकमत’कडे यासंदर्भातील अगदी बारीक तपशीलदेखील उपलब्ध आहे.
‘व्हॉट्सअॅप ग्रुप’च्या माध्यमातून चालते रॅकेट
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सायबर गुन्हेगारांकडून संचालित करण्यात येणाऱ्या ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’मध्ये प्रवेश मिळविला. या ग्रुपमध्ये देशभरातील अडीचशे जणांचा सहभाग होता. आर्यन रेड्डी नावाचा व्यक्ती त्याचा ॲडमिन होता. याबाबत माहिती काढली असता अशा प्रकारचे हजारो ग्रुप या गुन्हेगारांकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकाच वेळी संचालित करण्यात येत आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून अगोदर टीप्स व त्यानंतर प्रचंड नफ्याचे आमिष दाखविले जाते. ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली नामांकित कंपनीचे नाव समोर करत कमी पैशांत शेअर्स मिळवून देण्याचा दावा करण्यात येतो. एका विशिष्ट ॲपमध्ये नोंदणी करून मग हा गोरखधंदा सुरू होतो.
देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल
सर्वसाधारणत: राजस्थान, उत्तर प्रदेश, नोएडा येथून हे सायबर गुन्हेगार हे मोठे रॅकेट संचालित करतात. ब्लॉक ट्रेडिंगमध्ये कमीत कमी ५० हजार रुपयांची गुंतवणूक अनिवार्य असते. इतरांना मिळणारा नफा पाहून लोक लाखो-कोटींमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना व्हर्च्युअल नफा दिसतो मात्र प्रत्यक्षात कधीही पैसा परत मिळत नाही. मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, जयपूर, कोलकाता, बंगळुरू, कोची इत्यादी ठिकाणी या टोळीविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत.
ग्रुपमधील ‘प्रोफेसर’चा खेळ
व्हॉट्सअॅप ग्रुप्समधील सूत्रधाराला प्रोफेसर किंवा कॅप्टन असे संबोधण्यात येते. तो एखाद्या प्राध्यापकाप्रमाणे शेअर बाजारातील टीप्स, तांत्रिक बाबी समजावून सांगतो. महिना, दोन महिन्यांनंतर गुंतवणूकादारांचा विश्वास बसू लागतो. त्यानंतर ‘प्रोफेसर’चा खेळ सुरू होतो. ‘(ए ३६६) हाय क्वॉलिटी स्टॉक ग्रुप’सारख्या शेकडो ग्रुप्सवरील हजारो गुंतवणूकदारांना एकाच वेळी असे अनेक प्रोफेसर नफ्याचा फंडा सांगत गंडा घालतात.
( पुढील भागात : शंभर रुपयांचा शेअर ऐंशी रुपयांना...अशी आहे ‘प्रोफेसर गँग’ची मोडस ऑपरेंडी)