पतीशी भांडणानंतर ‘तिची’ रेल्वेमध्येच आत्महत्या; घटनेनंतर मुलाला घेऊन पती पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 08:00 IST2022-05-10T07:44:07+5:302022-05-10T08:00:43+5:30
वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरतीकुमारी मिथिलेश झा या २० वर्षीय महिलेने रविवारी शौचालयाच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पतीशी भांडणानंतर ‘तिची’ रेल्वेमध्येच आत्महत्या; घटनेनंतर मुलाला घेऊन पती पळाला
- हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : बांद्रा (मुंबई) वरून बिहारकडे निघालेल्या वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरतीकुमारी मिथिलेश झा या २० वर्षीय महिलेने रविवारी शौचालयाच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिच्यासोबत असलेल्या तिच्या पतीने घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलीस शोध घेत आहेत.
वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून मृत महिला आरती, तिचा पती मिथिलेश आणि त्यांचा छोटा मुलगा हे बिहारमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. आरक्षित डब्यातून शौचालयाच्या कडेला विनातिकीट प्रवास करणाऱ्या या पती-पत्नीमध्ये काही कारणांनी शाब्दिक खटका उडाल्याचे प्रवाशांनी सांगितले. बोगीतील शौचालयाला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये याबाबत कुजबुज सुरू झाली. काही प्रवाशांनी डब्यातील तिकीट तपासनिसाला याची माहिती दिली.
नातेवाइकांना बोलाविले
याबाबत पतीचा मुलासोबत बोरीवली प्लॅटफॉर्मवरून चालत असलेला फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. मृत्यू अहवाल येण्याआधीच पालघर आरपीएफच्या काही कर्मचाऱ्यांनी माहिती अन्य लोकांना दिल्याने या तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपण आरपीएफचे अधिकारी राय यांच्याकडे आक्षेप नोंदविल्याचे लोहमार्ग पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. महिलेच्या नातेवाइकांना बिहार येथून बोलाविण्यात आले आहे.