कल्याण : गुंड विशाल गवळीने घराच्या परिसरात गांजा विक्रीचा अड्डा सुरू केला होता. त्याला गांजा, दारू पिण्याचे व्यसन होते. या नशेत तो अल्पवयीन मुली आणि महिलांना शिकार करायचा, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करताना त्याने गांजा, दारूचे सेवन केले होते की नाही याचा तपास पोलिस करीत आहेत.
आरोपी विशाल राहत असलेल्या परिसरात तयार केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मवाली पोरांसाेबत गांजा पिणे हा त्याचा उद्योग होता. विशाल हा पूर्वी रिक्षा चालवत होता. त्यानंतर एका खासगी कंपनीत कामाला होता. विशालच्या वडिलांचा व्याजाने पैसे देण्याचा धंदा आहे. कल्याण पूर्वेतील रिक्षाचालक आणि भाजीविक्रेत्यांना त्याचे वडील व्याजाने पैसे देत. वडिलांनी व्याजाने दिलेले पैसे विशालचा भाऊ वसूल करतो. दोन वर्षांपूर्वी एक मुलगी क्लासवरून घरी येत असताना विशालने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या पालकांनी काेळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावर पोलिसांनी विशालला अटक केली होती. त्यावेळी पोलिस ठाण्यात त्याचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना दोन बाेटे उंचावून व्ही फॉर व्हिक्टरीची खूण दाखविली होती. त्यानंतर त्याला एका प्रकरणात पोलिसांनी पुन्हा अटक केली. राजकीय दबावापोटी ९० दिवसांच्या आत पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्याला जामीन मिळाला होता.
‘साथ दिली नाही तर जिवे मारेन’विशालला विविध गुन्ह्यांत यापूर्वी अटक झाली तेव्हा त्याची पत्नी साक्षी ही त्याला सोडविण्यासाठी पुढे होती. विशालची आतापर्यंत तीन लग्ने झाल्याची माहिती आहे. आत्ताच्या गुन्ह्यात त्याला साथ देणारी त्याची पत्नी साक्षी ही तिसरी पत्नी आहे. साक्षी हिला पोलिसांनी अटक केली. साथ दिली नाही तर जिवे मारेन, अशी धमकी विशालने तिला दिली. लग्न करण्यापूर्वी विशालने तिच्यासोबतही दुष्कृत्य केले होते. त्यानंतर तिच्यासोबत लग्न केले.
आरोपीच्या घरात सापडली हत्यारे- हत्येनंतर मुलीचा मृतदेह आराेपीने पत्नी आणि त्याचा रिक्षाचालक मित्र याच्यासोबतीने बापगावनजीक निर्जनस्थळी फेकून दिला. - विशालला शनिवारी पोलिसांनी बापगाव येथे ज्या ठिकाणी मृतदेह फेकून दिला तेथे नेले होते. त्या घटनास्थळाचा शनिवारी पंचनामा केला. - विशालला त्याच्या घरी नेण्यात आले. त्या ठिकाणी पीडित मुलीचे कपडे आरोपीने फेकून दिले होते. - ते रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपीच्या घरात हत्यारे मिळून आली. हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात होता.