नांदेड : शिपाई पदाच्या नोकरीसाठी तिसऱ्या अपत्याची अडचण ठरणार म्हणून पित्याने चक्क पोटच्या मुलीलाच एक लाख रुपयात विक्री केले. ही घटना २०१८ मध्ये घडली. पतीपासून वेगळे राहत असलेल्या महिलेला ही बाब सहा वर्षांनी समजल्यानंतर त्यांनी एनजीओच्या मदतीने भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती आणि मुलीला विकत घेणारा अशा दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुरेखा व गजानन वांजरखेडे यांचा २००९ मध्ये विवाह झाला. त्यांना एक मुलगा व दोन जुळ्या मुली झाल्या. २०१८ मध्ये गजाननने सुरेखा यांना नातेवाईक देवीदास जोशी यांना एक मुलगी विकत देऊ, असे सांगितले. त्याला सुरेखाने विरोध केला. गजाननने तिन्ही अपत्यांना जवळ ठेवून सुरेखाला हाकलून दिले. त्यानंतर जोशी यांना एक लाखात मुलगी विकली. २०२३ मध्ये गजाननला अनुकंपा तत्वावर हिंगोली येथे शिपाई पदावर नोकरी लागली. काही दिवसानंतर सुरेखा यांना दीर श्यामने मुलीबाबत सांगितले.