हरियाणातील जींद-रोहतक राष्ट्रीय महामार्गावर एका ज्वेलरकडून पन्नास लाख रुपयांची लूट करण्यात आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, या लुटीमागे ज्वेलरचाच एक नातेवाईक आपल्या मित्रांसोबत सामील होता, हे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अजूनही फरार आहे.
या संपूर्ण लुटीचा मास्टरमाईंड हरिओम नावाचा तरुण आहे. हरिओम हा जुलाना येथील रहिवासी असून, तो लुटीचा बळी ठरलेल्या अनिल ज्वेलरचा दूरचा नातेवाईक आहे. जींद येथील रहिवासी अनिल यांची भिवानी रोडवर ज्वेलरीचे दुकान आहे. अनिल नियमितपणे रोहतक येथून सोने-चांदी आणत असत. ७ जुलै रोजीही ते रोहतक येथून ४२० ग्रॅम सोने, ५ किलो चांदी आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन जींदकडे येत होते.
पिस्तूल दाखवून लुटलं
अनिल रोहतकहून निघाल्यापासूनच हरिओम त्याच्या मागावर होता. तो अनिलच्या प्रत्येक हालचालीची माहिती आपल्या मित्रांना देत होता. अनिल पोली गावाजवळच्या कालव्यापाशी पोहोचताच, हरिओमच्या साथीदारांनी आपली मोटरसायकल अनिलच्या बाईकसमोर घातली. यामुळे अनिल खाली पडले. आरोपींनी त्यांना लाठी-काठीने मारहाण केली आणि त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून सोने-चांदी असलेली त्यांची सॅक हिसकावून घेतली व तेथून पसार झाले.
पोलिसांनी कसा लावला छडा?
या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अनिल ज्या दुकानातून सोने-चांदी घेऊन आले होते, तिथून ते रोहतक बायपासपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. अनिल कुमार यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा मोबाईल डेटाही पोलिसांनी तपासला. याच तपासात पोलिसांना अनिलच्या एका कर्मचाऱ्याचे आणि हरिओमचे संभाषण आढळून आले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी हरिओम, अनिलचा कर्मचारी आणि मुख्य आरोपीच्या मित्रांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी लुटीची कबुली दिली.
पैशांच्या अडचणीतून रचला कट
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, हरिओम हा अनिलचा नातेवाईक आहे. एका महिन्यापूर्वी त्याने जुलाना येथील एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. तो गुरुग्राममधील एका खासगी कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. लग्नानंतर त्याने नोकरी सोडली आणि कुटुंबियांपासून दूर जुलाना येथे भाड्याच्या घरात राहू लागला. त्याला पैशांची चणचण भासू लागली, त्यामुळे त्याने ही लुटीची योजना आखली.
अनिल कुठून सोने-चांदी आणतात, हे हरिओमला माहीत होते. तो अनिलच्या दुकानातही नेहमी जात-येत असे आणि त्याने अनिलच्या एका कर्मचाऱ्याशीही ओळख करून घेतली होती. अनिल रोहतकहून सोने-चांदी घेऊन येत असल्याची माहिती त्याच कर्मचाऱ्याने हरिओमला दिली होती. या माहितीच्या आधारावरच हरिओमने हा लुटीचा कट रचला.