बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर सापाने चावा घेतल्याचा बहाणा करून तो रुग्णालयात दाखल झाला. मात्र, त्याच्या दोन दिव्यांग मुलींनी केलेल्या इशाऱ्यांमुळे हे क्रूर सत्य उघडकीस आले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सदर घटना परसविगहा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुल्तानी गावात घडली. लग्नाला १२ वर्षे झाली असताना एका नराधम पतीने पाच मुलांच्या आई असलेल्या आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पती रंजन दास याला अटक केली आहे.
परसविगहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रिंकी देवी (३४) हिच्या भावाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत महिलेचा भाऊ बबलू कुमार याने सांगितले की, २०१३ मध्ये रिंकीचे लग्न रंजन दाससोबत झाले होते. त्यांना पाच मुले असून, त्यापैकी दोन मुली बोलू शकत नाहीत.
अनावश्यक खर्चातून वाद
बबलू कुमारने पुढे सांगितले की, "माझ्या बहिणीचा पती रंजन दास हा मजुरी करतो, पण तो खाण्या-पिण्यात खूप पैसे उधळत असे. माझी बहीण त्याच्या या अनावश्यक खर्चाला विरोध करत होती. गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नकोस, असा ती त्याला सल्ला देत होती. याच कारणावरून दोघांमध्ये रोज भांडणे होत होती."
आईची हत्या, मुलींनी सांगितली कहाणी
काही दिवसांपासून रिंकी भांडणांना कंटाळून माहेरी शंकरगंज येथे राहत होती. गुरुवारी रंजन तिला समजावून पुन्हा घरी घेऊन गेला. पण रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि रंजनने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रिंकीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर बबलू तिच्या घरी पोहोचला. तिथे त्याच्या दोन दिव्यांग भाच्यांनी खुणा करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी रंजनचा शोध सुरू केला, पण तो कुठेही सापडला नाही, त्याचे कुटुंबीयही पळून गेले होते.
साप चावल्याचा बनाव उघड
बबलू कुमार म्हणाला, "आम्हाला नंतर समजले की रंजनने सापाने चावा घेतल्याचा बनाव करून स्वतःला रुग्णालयात दाखल केले आहे. आम्ही लगेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयातून त्याला अटक केली." पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत सापाने चावा घेतल्याचे प्रकरण संशयास्पद वाटत आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.