मध्य प्रदेशातील निवाड़ी जिल्ह्यातून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर प्रकरणातून एक अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतरही एक्स-बॉयफ्रेंडला भेटत राहणे एका विवाहित तरुणीच्या जीवावर बेतले. प्रियकराने आधी तिच्यासोबत संबंध ठेवले आणि नंतर तिची गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने तिचा मृतदेह आपल्या घराच्या कच्च्या फरशीत पुरला आणि त्यावर चक्क खाट टाकून दोन दिवस आराम केला.
या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच, या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या कोठडीतून फरार झाल्याने आता परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
रजपुरा गावातील रोहिणी राजपूत नावाची विवाहित महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासात समोर आले की, रोहिणीचे लग्न होण्यापूर्वी रतिराम राजपूत नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरही ती त्याला लपून भेटत होती.
याच संशयाच्या आधारावर पोलिसांनी रतिराम राजपूतला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत आरोपीने रोहिणीच्या खुनाची कबुली दिली आणि त्याने क्रूरतेचा कळस कसा गाठला, हे सांगितले.
लग्नाचा दबाव नडला!
आरोपी रतिरामने पोलिसांना सांगितले की, रोहिणी माझ्यावर वारंवार लग्नासाठी दबाव टाकत होती. ती तिच्या पतीला सोडण्यास तयार होती. मात्र, रतिरामला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. याच कारणामुळे रतिरामने आपल्या मित्रांसोबत मिळून रोहिणीला कायमचे संपवण्याचा कट रचला. २ ऑक्टोबरच्या रात्री त्याने रोहिणीला आपल्या गावातील एका घरी भेटण्यासाठी बोलावले. तिथे संबंध ठेवल्यानंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली.
मृतदेहावरच खाट टाकून दोन दिवस झोपला!
रोहिणीचा खून केल्यानंतर आरोपी रतिरामने त्याचे मित्र कालीचरण, मुकेश आणि ज्ञान सिंग यांच्या मदतीने घरातच कच्च्या फरशीवर मोठा खड्डा खणला आणि रोहिणीचा मृतदेह त्यात पुरला. त्यानंतर फरशी माती आणि शेणाने व्यवस्थित सारवून घेतली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह पुरल्यानंतर आरोपी दोन दिवस त्याच ठिकाणी खाट टाकून शांतपणे झोपला होता.
आरोपी फरार, दोन पोलीस निलंबित
या धक्कादायक खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी रतिरामला अटक केली. मात्र, पुढील तपास सुरू असतानाच आरोपी रतिराम पोलिसांना चकवून कोठडीतून पसार झाला. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी तातडीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून पुढील तपास सुरू आहे.