प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. ऑनलाइन प्रेमात पडलेल्या एका तरुणाला याच प्रेमाचा मोठा फटका बसला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाला डेटिंग ॲपवर भेटलेल्या एका 'परदेशी ड्रीमगर्ल'सोबत रोमान्स करणं चांगलंच महागात पडलं. प्रेमाच्या या जाळ्यात तब्बल १.९० लाख रुपये गमावल्यानंतर जेव्हा या 'प्रेयसी'चं सत्य समोर आलं, तेव्हा तरुणाला मोठा धक्का बसला. दिल्ली पोलिसांनी या हाय-प्रोफाईल सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे.
डेटिंग ॲपवर जुळलं 'विदेशी' नातं
३४ वर्षीय तरुण दिल्लीतील एम्समध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहे. नोकरी चांगली असली तरी त्याला एकटेपण जाणवत होतं. एकीकडे चांगल्या जोडीदाराच्या शोधात असलेल्या अभिषेकने गेल्या वर्षी एका डेटिंग ॲपवर अकाउंट उघडले. तिथे त्याची ओळख एका परदेशी तरुणीशी झाली. प्रेमाच्या सीमा नसतात, असं मानून अभिषेक तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला. चॅटिंग सुरू झाली, नंबरची देवाणघेवाण झाली आणि महिनाभरातच दोघांमध्ये जवळीक वाढली.
तिने आपण एका ब्युटी प्रॉडक्ट कंपनीत काम करत असल्याचं सांगून मैत्री वाढवली. दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा रंगू लागल्या. मात्र, अभिषेकला हे कळलंच नाही की ज्या स्वप्नसुंदरीसोबत तो बोलत आहे, ती खरं तर एक पुरुष आहे.
१.९० लाखांची झाली फसवणूक
प्रेमाच्या या गोड बोलण्यांमधून तिने हळूच तेलाच्या व्यवसायाचा एक आकर्षक प्रस्ताव अभिषेकसमोर ठेवला. ती म्हणाली की, आसाममधून एक दुर्मिळ तेल २ लाख रुपये प्रति लिटरने खरेदी करून ते बाजारात ३.५ लाख रुपये प्रति लिटरने विकले जाऊ शकते. भविष्यात मोठा नफा मिळण्याच्या आशेने तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या खात्यात तब्बल १.९० लाख रुपये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यावर लगेचच ती 'ड्रीमगर्ल' गायब झाली.
बुऱ्हाडीतून झाली अटक, सत्य आलं समोर
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिषेकने फेब्रुवारीमध्ये दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा सायबर फसवणुकीचा हा मोठा कट उघडकीस आला. ज्या विदेशी युवतीच्या प्रेमात अभिषेक वेडा झाला होता, ती खरं तर युगांडाचा नागरिक असलेला ३८ वर्षीय मायकल इगा निघाला. आरोपी इगा परदेशात असल्याचे सांगत होता, पण पोलिसांनी त्याला दिल्लीतील बुऱ्हाडी परिसरातील एका अपार्टमेंटमधून अटक केली. त्याने बनावट महिला प्रोफाईल तयार करून लोकांना हनी ट्रॅपमध्ये फसवून गुंतवणूक करण्याची लालच दिली होती.
दिल्ली-एनसीआरमधील सुमारे २००हून अधिक अपार्टमेंट्समध्ये छापेमारी केल्यानंतर पोलिसांना इगाच्या कार्यपद्धतीचा अंदाज आला. इगा मुलीचे फोटो वापरून डेटिंग ॲपवर लोकांना फसवून सुमारे १४हून अधिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी इगाला अटक केली असून युगांडा दूतावासाला त्याची माहिती देण्यात आली आहे.
Web Summary : An AIIMS researcher lost ₹1.9 lakh to a dating app scam involving a fake foreign woman. He was lured into investing in a bogus oil business. The 'woman' was actually a Ugandan man arrested in Delhi for online fraud.
Web Summary : एक एम्स शोधकर्ता ने नकली विदेशी महिला से जुड़े डेटिंग ऐप घोटाले में ₹1.9 लाख गंवाए। उसे नकली तेल व्यवसाय में निवेश करने के लिए लुभाया गया। 'महिला' वास्तव में युगांडा का एक आदमी था जिसे दिल्ली में ऑनलाइन धोखाधड़ी के लिए गिरफ्तार किया गया था।