भोपाळमधील ग्लॅमरस मॉडेल खुशबू अहिरवार हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करत आरोपी कासिम याच्याविरुद्ध मारहाण, धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात कासिमने खुशबूवर लग्नासाठी धर्म परिवर्तन करण्याचा दबाव आणला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गत रविवारी रात्री उज्जैनहून भोपाळला परतत असताना खुशबूचा मृत्यू झाला होता.
पोस्टमार्टम रिपोर्टने दिला मोठा धक्का
खुशबूच्या मृत्यूनंतर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधील खुलासा अतिशय धक्कादायक आहे. वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले की, खुशबू गर्भवती होती आणि तिच्या गर्भाशयाची नळी फुटल्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनुसार, खुशबू आणि कासिम हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, खुशबूच्या कुटुंबीयांनी हे सत्य स्वीकारण्यास नकार दिला असून, त्यांनी थेट कासिमवर हत्या केल्याचा आरोप केला आहे.
नाव लपवून संबंध ठेवल्याचा कुटुंबाचा दावा
खुशबूच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी कासिमने सुरुवातीला स्वतःचे नाव 'राहुल' असे सांगितले होते आणि नंतर खुशबूशी संबंध जोडले. जेव्हा त्याचे खरे नाव आणि ओळख समोर आली, तेव्हा खुशबू त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होती. याच कारणामुळे तिची हत्या करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.
बुरख्यावरून प्रश्नचिन्ह आणि रिपोर्टवर आक्षेप
बुधवारी खुशबूचे कुटुंबीय भोपाळच्या छोला मंदिर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली. कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की, खुशबूच्या घरात बुरखा सापडला आहे आणि कासिम तिच्यावर बुरखा परिधान करण्यासाठी आणि रोजा ठेवण्यासाठी दबाव आणत होता.
इतकेच नाही तर, कुटुंबियांनी पोस्टमार्टम रिपोर्टवरही तीव्र आक्षेप घेतला आहे. खुशबू गर्भवती नव्हती आणि रिपोर्ट चुकीचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. खुशबूला न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपी कासिमवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस चौकशीत कासिमचा कबुलीनामा
या प्रकरणातील आरोपी कासिम सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांच्या चौकशीत कासिमने अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत. "होय, खुशबू गर्भवती होती आणि ते बाळ आमचेच होते. आम्ही लवकरच लग्न करणार होतो," असे कासिमने पोलिसांना सांगितले. तो म्हणाला की, तो खुशबूला भोपाळहून उज्जैनला आपल्या कुटुंबीयांना भेटायला घेऊन गेला होता. तेथून परतताना तिची तब्येत अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.
कुटुंबाचा आधार गेली खुशबू
खुशबूच्या बहिणींनी सांगितले की, खुशबू हीच कुटुंबाचा संपूर्ण खर्च चालवत होती. घरात केवळ आई आहे; तर तिचा भाऊ आणि वडिलांचे पूर्वीच निधन झाले आहे. अशा परिस्थितीत, राहुल नावाच्या व्यक्तीसोबत खुशबू राहत आहे, तो मुस्लिम आहे हे देखील कुटुंबीयांना नंतर कळले.
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, खुशबूचा मृत्यू शरीरांतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे झाला असून ती गर्भवती होती, हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आता कुटुंबीयांच्या आरोपांची गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाचा तपास लव्ह-जिहादच्या दिशेनेही केला जात आहे.