यमुनानगरच्या रादौर परिसरात पाच दिवसांपूर्वी ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह गोठ्यात आढळला होता. हत्येनंतर कुटुंबाने जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत ते मृतदेह घेणार नाही असं सांगितलं. कारण गेल्या २५ दिवसांत त्यांच्या कुटुंबातील ही दुसरी हत्या होती. पोलिसांनी केलेल्या तपासात एक धक्कादायक सत्य समोर आले.
सुनेनेच तिच्या सासऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सासऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सून ढसाढसा रडली होती. पोलिसांना या प्रकरणात सुनेचा संशय आला. आता तिची चौकशी केली जात आहे. सून पोलिसांवरच आरोप करत होती. आरोपीसोबत पोलिसांचं संगनमत असल्याचं म्हणत होती. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात ओमप्रकाश यांच्या हत्येमागे सून ललिताच असल्याचं उघड झालं. तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून ही हत्या केली.
अटक करण्याआधी सून ललिता पोलिसांवरच गंभीर आरोप करत होती. ती पोलीस आरोपींना भेटल्याचा दावा करत मीडियाला पोलिसांचेच व्हिडिओ काढण्यास सांगत होती. पण आता पोलिसांनी या हत्येमागचं गूढ उकललं आहे, त्यामुळे सून ललिता हिच्याकडे बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही. सध्या पोलिसांनी ललिता आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
सासऱ्यांना सुनेच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश यांना सुनेचा बॉयफ्रेंड असल्याचं सत्य समजलं होतं. हे सत्य इतर कोणालाही कळू नये म्हणून ललिता हिने तिच्या सासऱ्यांची हत्या करण्याचा भयंकर कट रचला. ललिताने सासऱ्यांना गोठ्यात झोपायला पाठवलं आणि नंतर तिथेच त्यांचा गळा चिरला. २० दिवसांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी देखील पोलीस आता तपास करत आहेत.