Haryana Crime: हरियाणातून देशाला हादरवणारी बातमी समोर आली आहे.हरियाणातील पानिपतमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी तिच्यावर आलटून पालटून बलात्कार केला. यावेळी पीडित महिला रेल्वे रुळांवर पडली. त्याचवेळी ट्रेन अंगावरुन गेल्याने महिलेला तिचे पाय गमवावे लागले. राज्य रेल्वे पोलिसांच्या पोलीस अधिक्षक निकिता गेहलोत यांनी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे.
हरियाणातील पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपींमुळे ती रेल्वे रुळांवर पडली. दुर्दैवाने त्याच रेल्वे रुळावरुन एक ट्रेन जात होती ज्यामुळे महिलेचा पाय कापला गेला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडित महिला २४ जून रोजी घरातून बेपत्ता झाली होती. २६ जून रोजी ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. भांडण झाल्यामुळे ती घरातून पडली. मला वाटले की ती परत येईल कारण तिने यापूर्वीही असे केले होते. घरातून बाहेर पडल्यानंतर ती स्वतःहून परत येत असे. पण दोन दिवस ती परत आली नाही तेव्हा पोलिसांकडे तक्रार केली असं पीडितेच्या पतीने सांगितले.
"पानिपतमधील घरातून कोणालाही न सांगता ही महिला निघाली होती. ती रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर खुर्चीवर बसली होती. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती तिच्याकडे आली. त्याने सांगितले की तुझ्या पतीने तुला आणण्यासाठी मला पाठवले आहे. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली. तो माणूस तिला मालाच्या गोदामाजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आणखी तीन ते चार तरुण आले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा पाय रसायनामुळे घसरला आणि ती रेल्वे ट्रॅकवर पडली. ट्रेनने धडक दिल्याने तिचा पाय कापला गेला," अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. एसआयटीने महिलेच्या परिसरातील ते पानिपत आणि सोनीपत रेल्वे स्थानकांपर्यंत बसवलेल्या २० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे, विशेष तपास पथकाने घटनेच्या संध्याकाळपासून रात्रीपर्यंत रेल्वे स्थानकावर घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपास सुरु केला आहे. तिच्या जबाबात नमूद केलेल्या वेळी रेल्वे स्थानकावरील कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये ती महिला सध्या कुठेही दिसत नाही. त्यामुळे तपास पथकाने पानीपत, गणौर ते सोनीपत पर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर अन्नपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचीही चौकशी करायला सुरुवात केली आहे.