आईला त्रास दिला अन् नोकरी गेली म्हणून मुलाने रचला उद्योजकाच्या हत्येचा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 20:03 IST2022-06-07T20:03:24+5:302022-06-07T20:03:35+5:30
सिनेस्टाइल झाला खुनाचा उलगडा, नंदकुमार यांच्यावर तलवार, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढविताना शस्त्राचा एक वार चुकून एका हल्लेखोराच्या पायावर लागला

आईला त्रास दिला अन् नोकरी गेली म्हणून मुलाने रचला उद्योजकाच्या हत्येचा कट
नाशिक : आपल्या आईची नोकरी गेली व तिला कंपनीत काम करताना त्रास दिला गेला, याचा राग मनात धरून त्या महिलेच्या मुलाने आपल्या तिघा मित्रांच्या मदतीने नंदकुमार आहेर यांच्यावर तलवार, चॉपरने हल्ला चढवून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या खुनाच्या घटनेचा तपास सुरू करत जखमी झालेल्या एका हल्लेखोराने दिलेल्या माहितीवरून या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता प्रथमदर्शनी वर्तविली आहे. दरम्यान, या खुनाच्या घटनेतील चौघे संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, एक रुग्णालयात उपचार घेत आहेत व त्याचे फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये गरवारे पॉइंटजवळील असलेल्या आहेर इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीत नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर (५०, रा. महात्मानगर) हे त्यांच्या स्कॉर्पिओ कारमधून (एमएच १५ जीए १८६१) आले. प्रवेशद्वारावर कारमधून ते उतरले असता दुचाकीने आलेल्या चौघांनी तलवार व चॉपरसारख्या धारधार हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यात, पोटात व पाठीवर खोलवर वार लागले. दोघा कामगारांनी त्वरित पाथर्डीफाटा येथील रुग्णालयात हलविले व तेथून पुन्हा अधिक उपचारासाठी जुना आडगावनाक्यावरील अपोली रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे डॉक्टरांनी आहेर यांना तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. ‘गुगल’ श्वानाने हल्लेखोरांचा माग दाखविला त्या दिशेने पोलिसांनी जात रस्त्यात संशयितांपैकी एकाची चप्पल पोलिसांना आढळून आली. ही चप्पल हुंगल्यानंतर गुगल श्वान आणखी पुढे गेले. चौघा हल्लेखोरांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा आला हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात !
नंदकुमार यांच्यावर तलवार, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढविताना शस्त्राचा एक वार चुकून एका हल्लेखोराच्या पायावर लागला. यामुळे तोदेखील रक्तबंबाळ झाला. त्याच्या साथीदारांनी त्याला दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांना विचारले असता त्याला कंपनीत काम करताना पत्रा लागल्याने तो जखमी झाला, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जखम बघून डॉक्टरांचा संशय बळावला असता त्याच वेळी नाशिक शहर डॉक्टर-पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपवर खुनातील हल्लेखोर जखमी असून तो रुग्णालयात उपचारासाठी येऊ शकतो, असा मेसेज प्राप्त झाला. डॉक्टरांनी तो मेसेज वाचल्यानंतर त्यास उपचारासाठी दाखल करुन घेत पोलिसांना माहिती कळविली. घटनास्थळापासून काही अंतरावरच रुग्णालय असल्याने पोलीस तेथे पोहोचले; मात्र तोपर्यंत त्याच्या साथीदारांना चाहूल लागल्याने तिघे त्याला सोडून फरार झाले.